कोरोना बाधितांच्या संख्येत घट मात्र संक्रमणाचा दर ९ टक्क्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:28+5:302021-05-28T04:07:28+5:30
सावनेर / काटोल / कळमेश्वर/ हिंगणा / उमरेड / रामटेक / नरखेड / कुही : नागपूर जिल्ह्यातील ...
सावनेर / काटोल / कळमेश्वर/ हिंगणा / उमरेड / रामटेक / नरखेड / कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी संक्रमणाचा दर अद्यापही ९ टक्क्यावर आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात २,१०८ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०८ (९.८६ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १,४१,४२८ इतकी झाली आहे. १,३४,८७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २,२७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,८७० इतकी आहे.
हिंगणा तालुक्यात २७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे १३, टाकळघाट (८) , कान्होलीबारा (६), हिंगणा (४), खडकी (३), भारकस (२) तर देवळी काळबांडे, जुनेवानी, निलडोह, बोरगाव, गुमगाव, उमरीवाघ, खैरी मोरेश्वर व सावंगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ११,८४६ इतकी झाली आहे. यातील १०,९१२ कोरोनामुक्त झाले तर २७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात १३ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न. प. क्षेत्रात ३ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे ३, मोहपा, खुर्सापार येथे प्रत्येकी दोन तर सांगवी मोहगाव, घोराड, म्हसेपठार येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
सावनेर तालुक्यात ६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. कुही तालुक्यात १३४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात तितूर व अंबाडी येथे प्रत्येकी तीन, मांढळ (२) तर कुही येथे एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ३८४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ७ रुग्ण तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रांतर्गत २, कोंढाळी (६) तर येनवा केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात ४ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात केवळ ३ रुग्णांची नोंद झाली. तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६,५०५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,२१३ कोरोनामुक्त झाले तर २९२ रुग्णांचा मृत्यू झाला. उमरेड तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड ग्रामीणमध्ये धोका वाढला
नरखेड तालुक्यात रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. तालुक्यात १९ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२० तर शहरातील २७ इतकी आहे. ग्रामीण भागात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (३), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (६), मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र (२) तर मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ८ रुग्णांची नोंद झाली.