दरवर्षी झोडपतो अवकाळी, शासन धोरणात बदल मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:08+5:302021-03-25T04:08:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘पोळा, अन्‌ पाऊस झाला भोळा’ असा विदर्भात समज आहे. यापूर्वीची स्थिती लक्षात घेतली तर ...

However, there is no change in government policy | दरवर्षी झोडपतो अवकाळी, शासन धोरणात बदल मात्र नाही

दरवर्षी झोडपतो अवकाळी, शासन धोरणात बदल मात्र नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘पोळा, अन्‌ पाऊस झाला भोळा’ असा विदर्भात समज आहे. यापूर्वीची स्थिती लक्षात घेतली तर तो काही खोटा नाही. पोळ्यानंतर पाऊस कमी होत जातो, नंतर मृग नक्षत्रापासून पुन्हा मान्सून बरसतो. मात्र अलीकडे विदर्भातील शेतकऱ्यांना दरवर्षी वेगळाच अनुभव येत आहे. डिसेंबरपासून पाऊस पुन्हा येतो. एप्रिल-मे महिन्यातही चिंब भिजवृून जातो. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक पडत असला आणि बरेच नुकसान करणारा असला तरी शासन धोरणात मात्र या बदलाची अद्याप दखल घेतलेली दिसत नाही.

विदर्भात मागील सहा-सात वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस येत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून त्याचे आगमन होते. तो पुढे मार्च-एप्रिलपर्यंत अधूनमधून येत राहतो. मागील काही वर्षांपासून ऋतुमान बदलले, त्यामुळे पावसाचे वेळापत्रकही बदलले. जूनमध्ये हमखास येणारा मृगाचा पाऊस जुलैपर्यंत लांबला. त्यामुळे सरासरी पर्जन्यमानात बदल झाला आहे.

दुष्काळ, पैसेवारी, टंचाई, आपात्कालीन पीक परिस्थिती ठरविण्यासाठी या सरासरी पर्जन्यमानाचा वापर केला जातो. मागील सहा-सात वर्षात डिसेंबर ते एप्रिल-मे या काळात सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. सोयाबीन, गहू, फळ उत्पादक तसेच भाजीपाला उत्पादकांना याचा फटका दरवर्षीच बसत आहे. मात्र अवकाळी पावसाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कसलीही मदत दिली जात नाही. प्रत्यक्षात सरासरी पर्जन्यमानाचा विचार करून महसूल आणि कृषी विभागाने यासाठी संयुक्त धोरण आखण्याची गरज आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा आवाजही शासनापर्यंत कुणीच पोहचवीत नसल्याने त्यांना दरवर्षी अश्रू पिऊन परिस्थितीला सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

...

शासनाचा शब्दांचा खेळ!

पावसाळा संपल्यावर चक्क दिवाळीनंतरही विदर्भात पाऊस येत असतो. मात्र त्याला अवकाळी न म्हणता परतीचा पाऊस म्हणा, असा शब्दांचा खेळ प्रशासन करत असते. पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक वातावरणानुसार तिकडे तशी परिस्थिती आहे. मात्र ही सरसकट मोजपट्टी मागील अनेक वर्षांपासून विदर्भातही लावली जात आहे. शासनाच्या रेकॉर्डवरही याची नोंद परतीचा पाऊस अशीच होत असल्याने, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीमध्ये सोईस्करपणे तांत्रिक अडथळे घालणे सोपे झाले आहे.

...

कोट

साधारणत: जानेवारीनंतर येणारा पाऊस अवकाळी असतो. त्याचा अंदाज तीन-चार दिवसापूर्वी येत असल्याने, सरासरी पर्जन्यमानामध्ये कायमस्वरूपी बदल करणे शक्य नसते. मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सावधगिरीचा आम्ही इशारा देत असतो. यंदाही पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक

...

नागपूर जिल्ह्यात ७ वर्षातील अवकाळी पाऊस

महिना - जानेवारी - फेब्रुवारी -मार्च - एप्रिल - मे

सरासरी - १२.७ - १२.१ - १४.५ - ७.२ - ११.५

वर्ष

२०१४ - ... - ५३.१ - ... - ... - ...

२०१५ - ७.२ - ११.१ - ७५.५ - ३५.७ - २३.८

२०१६ - ... - ४.६ - १८.४ - १२.४ - ५.९

२०१७ - २.० - ... -... - ... - ७.६

२०१८ - ... - १७.२ - ०.७ - १०.८ - ७.६

२०१९ - ... - ... - ... - ... - ...

२०२० - ४३.७ - १५.३ - २०.६ - ६.४ - १२.१

...

Web Title: However, there is no change in government policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.