नागपुरातील ऋत्विकच्या ‘हिट विकेट’ने सारेच संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 08:56 PM2018-02-13T20:56:07+5:302018-02-13T20:57:14+5:30
सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऋत्विक बोके. एमएचके संचेती स्कूलचा बारावीचा विद्यार्थी. अभ्यासात हुशार आणि खेळातही. क्रिकेट टीमचा बेस्ट बॉलर. सोमवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दिवसभर ऋत्विक घरीच होता. त्याने मनातले काहीच जाणवूही दिले नाही. सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.
त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनसमोरील मल्लिका अपार्टमेंटमध्ये बोके कुटुंब राहते. दिलीप बोके हे शिक्षक आहेत. ऋत्विक हा वर्धा रोडवरील एमएचके संचेती स्कूलमध्ये बारावीला शिकत होता. बारावीचे वर्ष असल्याने ऋत्विकने खेळाकडे थोडे दुर्लक्ष करून, अभ्यासात लक्ष केंद्रीत केले होते. इंजिनीअर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू होते. त्याची दैनंदिनी अतिशय व्यस्त होती. क्लासेस, कॉलेज, अभ्यास, मित्र यातच त्याचा भरपूर वेळ जायचा. एक आठ दिवसांपूर्वी वडिलांनी त्याला अभ्यासाबद्दल विचारले, त्याने व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. घरची मंडळी कधीच त्याला अभ्यासाबद्दल एक शब्दसुद्धा बोलली नाही. मुळात ऋत्विक असे काही बोलण्यास जागाच ठेवत नव्हता. अतिशय मनमिळावू, सर्वांशी बोलणारा, कुटुंबात-मित्रात, कॉलनीमध्ये सर्वांचा चाहता होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीतही आत्महत्येचे कुठलेही ठोस कारण पुढे आले नाही.
मुलांशी संवाद वाढवा
ऋत्विक ज्या वयाचा होता त्या वयात अनेकदा चांगल्या-वाईटातील फरक कळत नाही. विवेकावर भावना भारी पडतात. अशा स्थितीत आपल्या माणसांचा भावनिक आधार फारच गरजेचा असतो. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैलीत पालकांचा मुलांशी फारसा संवादच होत नाही. परिणामी मुलांच्या मनात काय चाललय कळत नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मुलांशी संवाद वाढविणे नितांत गरजेचे आहे.