HSC Exam Result; भंडाऱ्याची नंदिनी साठवणे नागपूर विभागात अव्वल; नागपुरातून वेदांत पांडे आणि अस्मा रंगवाला टॉपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 10:09 PM2023-05-25T22:09:56+5:302023-05-25T22:10:18+5:30
Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. भंडाऱ्याच्या नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी नंदिनी साठवणे हिने ९९.५० टक्के गुण मिळवत नागपूर विभागातून अव्वल स्थान पटकावले.
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. भंडाऱ्याच्या नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी नंदिनी साठवणे हिने ९९.५० टक्के गुण मिळवत नागपूर विभागातून अव्वल स्थान पटकावले.
तिला ६०० पैकी ५९७ गुण मिळाले. निकालात नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहिला, तर नागपूर जिल्हा माघारल्याचे चित्र पाहायला मिळाले. निकाल पाहता यंदाही मुलींचाच वरचष्मा राहिला.
नागपुरातून वेदांत पांडे हा विज्ञान शाखेतून, तर आसमा रंगवाला हिने कला शाखेतून अव्वल स्थान प्राप्त केले. विज्ञान शाखेत शिवाजी सायन्स महाविद्यालयाचा वेदांत पांडे याने ९६.८३ टक्के गुणांसह अव्वल, तर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीची अरुणिमा पवनीकर हिने ९५.५० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले. वाणिज्य शाखेत आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी चेतना मिश्रा हिने ९८.३ टक्के गुण मिळवीत दुसरे स्थान पटकावले. एमकेएच संचेती महाविद्यालयाची वेदश्री रत्नपारखी हिने ९७.३३ टक्के गुणांसह द्वितीय स्थान पाप्त केले, तर कला शाखेतून आदर्श विद्यामंदिरची अस्मा रंगवाला या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुण घेऊन अव्वल स्थान प्राप्त केले.
नागपूर विभागात एकूण १ लाख ५२ हजार १२१ पैकी १ लाख ३७ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९०.३५ टक्के निकाल लागला. त्यात ६७,४५९ मुले आणि ७०,००३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ८७.६३ टक्के, तर मुली ९३.१४ टक्के इतकी राहिली. विज्ञान शाखेतील ७४,८९७ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ७२,४२० म्हणजे ९६.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ५२,२१८ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ४३,२२ म्हणजे ८२.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत १८,७३९ पैकी १६,३८४ म्हणजे ८७.४३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमात ५,८८६ पैकी ५१५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर आयटीआयमधून ३८१ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी २८० विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
एकूण परीक्षार्थ्यांपैकी ३२ हजार ४५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी २३.६१ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हा आकडा ३९ टक्क्यांहून अधिक होता. द्वितीय श्रेणीत ७१ हजार ३५९ म्हणजेच ५१.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत द्वितीय श्रेणीत १३.५२ टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांत जास्त विद्यार्थी याच श्रेणीत आहेत.