दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 01:15 PM2022-06-09T13:15:13+5:302022-06-09T13:22:24+5:30
वेदिका ऑडिओ ऐकूनच नाेट्स तयार करायची आणि ब्रेल लिपीमध्ये लिहून त्यावरून अभ्यास करायची. काॅलेजमधील अभ्यासासह दरराेज किमान दाेन-तीन तास अभ्यास करण्याची तिची सवय आहे.
नागपूर : वेदिका इतर मुलांसारखी सामान्य नाही. ती ९० टक्के दृष्टिबाधित आहेत आणि थाेड्यातून जे काही दिसते ताेच तिच्या आयुष्याचा प्रकाश आहे. मात्र तिच्याकडे आहे आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची तयारी. ही जिद्द ठेवून वेदिकाने बारावीत ८३.३३ टक्के गुणांसह डाेळस यश संपादन केले आहे.
एलएडी महाविद्यालयात शिकणारी वेदिका प्रवीण गेडाम ही जन्मापासूनच दृष्टिबाधित आहे. तिच्या वयासह हा आजार अधिक बळावत गेला. तिचे वडील कंत्राटदार आहेत. आईवडिलांनी कधीही वेदिकाचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. दहावीच्या परीक्षेत ती शहरातून दुसऱ्या स्थानी हाेती. वडिलांनी सांगितले, काेणतीही गाेष्ट लवकर आत्मसात करण्याची तिच्यात क्षमता आहे. काॅलेजमध्ये शिक्षकांच्या शिकविण्याकडे तिचे लक्ष असते. घरी आल्यानंतर ती ऑडिओ ऐकूनच नाेट्स तयार करायची आणि ब्रेल लिपीमध्ये लिहून त्यावरून अभ्यास करायची. काॅलेजमधील अभ्यासासह दरराेज किमान दाेन-तीन तास अभ्यास करण्याची तिची सवय आहे.
वेदिकाला अभ्यासासाेबत संगीताचीही आवड आहे. संगीतात विशारद करून त्यात करियर करण्याची तिची इच्छा आहे. गायन आणि वाद्य या दाेन्हीमध्ये तिला उल्लेखनीय काही करण्याचे तिचे स्वप्न आहे.