पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 01:36 PM2022-06-09T13:36:54+5:302022-06-09T14:54:02+5:30
दु:खावर मात करत या तिन्ही विद्यार्थिनींनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
नागपूर : कोरोना एखाद्या महापुरासारखाच होता. त्याने माणसांना घेऊन जाताना कुठलीही तमा बाळगली नाही. अर्कजा आणि पलक यांच्या घरातही त्याने थैमान घातले. यात दोघींचे पितृछत्र हिरावले. मात्र या दुःखातही दोन्ही विद्यार्थिनी खचल्या नाही. संकटावर मात करून परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. प्रतिकूल परिस्थितीतही बारावीच्या परीक्षेत त्यांनी यशाची कमान उभारली. बारावीचा निकाल लागला अन् दोघींनीही यशाची पहिली पायरी घवघवीत गुणांनी गाठली. अर्कजा संजय देशमुख हिने विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण प्राप्त केले. तर, पलक राजेश मेश्राम हिने ८५.८० टक्के गुण मिळवले.
रुचिका धनराज राऊत हिची कहाणी ही काहीशी अशीच आहे. तिचा आई देवाघरी गेली व वडील शेतमजूर असल्यामुळे घरकामाची जबाबदारी तिच्यावर आली. घरचे सर्व आवरासावर झाले की मग कुठे अभ्यास; पण अशातही तिने गुणवंतांच्या यादीत नाव झळकविले. शिक्षणाबद्दलची आवड आणि आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द रुचिकाने बाळगली अन् बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.
अर्कजाला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचयं
मानेवाडा परिसरात राहणारी अर्कजा संजय देशमुख ही डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तिने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण प्राप्त केले. तीचे यश प्रकटल्यावर महाविद्यालयाने कौतुक केले. मात्र आपल्या यशाबद्दल बोलताना जराही तिने आपल्या वेदना, दु:ख व्यक्त केले नाही. चेहऱ्यावर हास्य ठेवत तिने सर्वांचे आभार मानले; पण वडिलांबद्दल विचारल्यावर ती काहीशी भावनात्मक झाली. बाबा गेलेत कोरोनात. एवढेच बोलून तिने स्वत:ला दुसऱ्याच क्षणी सावरून घेतले. या दुःखाची चर्चा व्हावी, मुलीला सहानुभूती मिळावी, असे कुटुंबियांकडूनही अजिबात वाटले नाही. खरे तर अर्कजासाठी हे वर्ष करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ती मुळातच हुशार असली तरी असे प्रसंग मनात सल करून जातात. परिणाम करिअरवर होतो. अर्कजाने मात्र त्यावर मात केली. अर्कजाला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. त्या दृष्टिकोनातून तिची वाटचाल सुरू आहे. नियमित अभ्यास वर्षभर तिने केला; पण शेवटच्या तीन महिन्यांत तिने अभ्यासावर जास्तच फोकस केला.
परिस्थितीला न जुमानता लष्करीबागची पलक चमकली
लष्करीबाग, पाचपावली भागात राहणाऱ्या पलक राजेश मेश्राम या विद्यार्थिनीचीही यशकथा अशीच आहे. जाईबाई चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या पलकने बारावीच्या परीक्षेत ८५.८० टक्के गुण मिळवले. पलकचे वडील एका कंपनीत कामाला होते, परिस्थिती बेताचीच पतीही शिक्षणाची जीद्द उराशी बाळगून मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर दुसरी मुलगी पदवी अभ्यासक्रम करीत आहे. गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि या कुटुंबावर डोंगर कोसळला.
आधारच तुटल्याने पुढे काय, हा प्रश्न समोर उभा होता. आई उभी ठाकली. एका महाविद्यालयात काम मिळविले. परिस्थिती अशी की बहुतेक वेळा पलकला पाचपावली ते शाळा असलेल्या सदरपर्यंत पायी ये-जा करावी लागायची. मात्र तिने अभ्यास सोडला नाही. आज तिच्या परिश्रमाचे सोने झाले. पलकला यूपीएससीत यशस्वी व्हायचे आहे आणि त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्यासाठी तिची तयारी आहे.
आई गेली, वडील शेतमजूर, घरची जबाबदारी तरीही बारावीत गुणवंत
पारशिवनी तालुक्यातील बाबूळवाडा तालुक्यातील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची रुचिका धनराज राऊत ही विद्यार्थिनी. आई शेतात काम करीत असताना वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. घरात मोठी असल्याने घरकामाची सर्व जबाबदारी तिच्यावर आली. वडील शेतमजूर, घरात आजोबा आणि लहान बहीण या सर्वांचे करूनसवरून ती शाळेला जायची. तालुक्यातील नवेगाव खैरी येथे झोपडीवजा घरात राहणाऱ्या रुचिकाने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले. शाळेच्या प्राचार्य राजश्री उखरे व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कोरोनाच्या काळातही तिच्या अभ्यासात खंड पडला नाही. आई-वडिलांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करून, प्रशासकीय सेवेत करिअर करायचे स्वप्न तिने बाळगले आहे.