झोपडीतून उगवला यशाचा ‘मंगल’मय सूर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:51 AM2018-05-31T09:51:44+5:302018-05-31T09:52:22+5:30
बारावीचा निकाल लागला आणि ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीचा निकाल लागला आणि गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. तिनेही बारावीची परीक्षा दिली होती. ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती. शिक्षकांनी ती काम करीत असलेले शेत गाठले आणि दुरूनच आनंदाने ही आनंदवार्ता दिली. ती मात्र निश्चल. ‘ठीक आहे सर..., उद्या शाळेत येते’, असे बोलून ती पुन्हा कामाला लागली.
ही गुणवंत मुलगी पारशिवनी तालुक्यातील सालई गावची मंगला भाऊराव झोड आहे. झोपडीत राहणाऱ्या मंगलाचा संघर्ष हेलावणारा आहेच. विदारक परिस्थितीतही तिने बारावीच्या परीक्षेत मिळविलेले ७७ टक्के गुण, गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांसारखेच प्रभावी आहे. मंगलाचे वडील अर्धांगवायुमुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यामुळे लहान भाऊ व मंगलाच्या शिक्षणाचा आणि संसाराचा भार एकट्या तिच्या आईवर आहे. कामावर गेली नाही तर जेवणार कसे, हा प्रश्नच जिथे रोज पडतो तिथे शाळेचा विचारही कसा करावा, हा प्रश्न मंगलापुढे होता. मात्र तिच्यात असलेली शैक्षणिक गुणवत्ता प्रभावित करणारी असल्याने, शिक्षकांना तिच्या गुणवत्तेवर विश्वास होता. म्हणूनच पैसे नसल्याने मंगला दहावीच्या परीक्षेला मुकणार ही माहिती मिळताच, शिक्षक मदतीसाठी पुढे आले. पुढे एका शिक्षकाने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचनच दिले. मंगला मात्र स्वाभिमानी. शिक्षकांचा आपल्यावर विश्वास आहे, तर आपणही त्यासाठी झटावे हा तिचा इरादा. परिस्थिती असतानाही तिने शिक्षकांपुढे हात पसरले नाही. ती शाळेच्या सुटीच्या दिवशी आईबरोबर शेतात काम करू लागली.
आई कामावर जात असल्याने शाळेच्या दिवशी वडिलांची काळजी, घरचे सर्व काम आटोपून १० किलोमीटरचा शाळेचा प्रवास सायकलने करायची. शाळेतून गेल्यावर पुन्हा घरची कामे आणि मिळालेल्या वेळेत अभ्यास.
अशाही परिस्थितीत तिने ७७ टक्के गुण मिळवित बाभुळवाड्याच्या लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून पहिला येण्याचा मान पटकाविला. मंगलाला पुढे स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा आहे. परंतु परिस्थिती साथ देईल का, याची भीती तिला आहे.