बारावीची विद्यार्थिनी दोन महिन्यानंतर झाली ‘टॉपर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:44 PM2018-07-26T12:44:41+5:302018-07-26T12:46:27+5:30
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले. या गुणांमुळे ती आता बारावी मानव्यशास्त्र शाखेतील ‘टॉपर’ झाली आहे. सेंटर पॉर्इंट स्कूल, काटोल रोड येथील विद्यार्थिनी इश्रिता गुप्ता या विद्यार्थिनीला ‘सीबीएसई’च्या कारभाराचा असा फटका बसला आहे.
२६ मे रोजी जाहीर झालेल्या ‘सीबीएसई’च्या निकालांमध्ये इश्रिता गुप्ता हिला ९२.६ टक्के गुण प्राप्त झाले होते.
राज्यशास्त्र विषय तिचा आवडीचा असूनदेखील तिला त्यातच सर्वात कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. १२ जुलै रोजी ‘सीबीएसई’ने शाळेला उत्तरपत्रिकेची प्रत पाठविली व यात तिचे २२ गुण वाढले.