नागपुरात हुडहुडी, पारा १०.३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:48 AM2021-02-01T10:48:30+5:302021-02-01T10:49:22+5:30
Nagpur News नागपुरात रविवारी कमाला तापमानाचा पारा ३.२ अंश सेल्सिअसने खालावला. शहरात तापमानाची नोंद १०.३ अंश सेल्सिअस झाली आहे. यंदाच्या माोसमातील जानेवारी महिन्यातील हा सर्वात कमी तापमानाचा दिवस ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर- नागपुरात रविवारी कमाला तापमानाचा पारा ३.२ अंश सेल्सिअसने खालावला. शहरात तापमानाची नोंद १०.३ अंश सेल्सिअस झाली आहे. यंदाच्या माोसमातील जानेवारी महिन्यातील हा सर्वात कमी तापमानाचा दिवस ठरला. सामान्यापेक्षा ४ अंशाने तापमान खालावल्याने वातावरणात हुडहुडी भरली.
पूर्व-दक्षिण-पूर्व दिशेला तासी ३.६ किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. वातावरण कोरडे असल्याने पारा खालावत चालला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे वातावरणात बदल जाणवत आहे. सध्या वातावरण कोरडे राहील. यामुळे रात्रीचे तापमानही सामान्यापेक्षा खालावलेले असेल. विदर्भात गोंदियातील तापमान ७.५ अंश नोंदविले गेले. ते विदर्भात सर्वात कमी आहे.
नागपुरात दिवसभर ऊन पडले. सोबतच गार वारेही वाहत होते. असे असतानाही दिवसाचे कमाल तापमान १.१ अंशाने वाढून २८.१ अंशा सेल्सिअसवर पोहचले. पारा सामान्यापेक्षा २ अंशाने खालावला असल्याने थंडीचा परिणाम सकाळीही जाणवला. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ५६ टक्के होती, तर सायंकाळी ५.३० वाजता आर्द्रता ३८ टक्के नोंदविली गेली.
डिसेंबर महिन्यात किमान तापमान ८.४ अंशाखाली गेले होते. मात्र जानेवारी महिना सुरू होताच थंडी कमी जाणवली. आता पुन्हा मागील आठवडाभरापासून थंडी जाणवायला लागली असून दोन दिवसात पाराही खालावला आहे, हे विशेष !