पाचपावली क्वॉरेटाईन सेंटरमध्ये प्रचंड गोंधळ; अधिकाऱ्यांशी वाद, तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:14 AM2020-05-27T04:14:04+5:302020-05-27T04:14:16+5:30
पाचपावलीच्या क्वॉरेटाईन सेंटरमध्ये मोमीनपुऱ्यातील अनेकांना ठेवण्यात आले आहे.
नागपूर : पाचपावली तील क्वॉरेटाईन सेंटर मध्ये मंगळवारी मध्यरात्री प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. येथे ठेवण्यात आलेल्या कोरोना बाधित संशयितांनी जेवण आणि पाणी मिळत नसल्याची तक्रार करून प्रचंड गोंधळ घातला. त्यांना समजावण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबतही बाधित संशयितांपैकी काहींनी असभ्य वर्तन केले.
पाचपावलीच्या क्वॉरेटाईन सेंटरमध्ये मोमीनपुऱ्यातील अनेकांना ठेवण्यात आले आहे. येथे पिण्याचे पाणी नसल्याची तक्रार करून रात्री ११ च्या सुमारास अनेकांनी खाली धाव घेतली. त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरुन काहींनी साहित्याची फेकाफेक केली. गोंधळ वाढल्याचे पाहून महापालिकेचे एक अधिकारी त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांना गोंधळ घालणाऱ्यांनी शिवीगाळ केली.
आम्हाला सकाळपासून जेवण नाही, पाणी मिळाले नाही, अशी तक्रार करून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारणे सुरु केले. छोट्या छोट्या मुलांच्या आई येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्या कशा जगतील,मुलांना दूध कसे मिळेल, असा प्रश्न करून काहींनी अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. गोंधळ वाढतच गेला. रात्रीचा १ वाजला तरी हा गोंधळ सुरू होता. ते कळाल्यानंतर पाचपावलीपोलिसांचा मोठा पोलीस ताफा क्वॉरेटाईन सेंटरमध्ये पोहोचला. त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना कसेबसे आवरून आत मध्ये पाठविले. वृत्त लिहिस्तोवर येथे तणावाची स्थिती होती.