जी-२०साठी संत्रानगरीत २१ व २२ मार्चलाच 'दिवाळी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:54 AM2023-03-03T11:54:10+5:302023-03-03T11:55:19+5:30
शहरभर विद्युत रोषणाई, सौंदर्यीकरणावर भर
नागपूर : मार्च महिन्याच्या २१ व २२ रोजी ‘जी-२०’ परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्ते व दुभाजकांची डागडुजी, दुभाजकातील वृक्षारोपण, सुशोभीकरण, रंगरंगोटी, भिंतीवर रंगकाम, तसेच उद्याने, पथदिव्यांच्या खांबावर व प्रमुख इमारतींवर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केली जात असून संत्रानगरीत २१ व २२ मार्चला 'दिवाळी' चे वातावरण असणार आहे.
विमानतळ ते हॉटेल प्राईड चौक ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू , फुटाळा तलाव परिसर तसेच परदेशी पाहुणे ज्या मार्गाने जातील. त्या मार्गावरील चौक, विद्युत खांबावर लायटिंग केली जाणार आहे. त्याशिवाय रस्ते दुभाजक, फुटपाथ, ऐतिहासिक वास्तू, विद्युत रोषणाईमुळे उजळून निघणार आहेत. यापैकी काही ठिकाणची लायटिंग कायमस्वरूपी असेल, तर काही ठिकाणची लायटिंग जी–२० परिषद संपल्यावर काढून घेतली जाणार आहे.
‘जी-२०’ परिषदेतील प्रतिनिधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी विकासकामे करण्यासाठी व सुशोभीकरणाच्या कामासाठी शासनाने महापालिकेला निधी दिला आहे. या निधीतून रस्ते दुरुस्ती, चौकांचे सौदर्यीकरण, २० उद्यानांत हिरवळ निर्माण करणे, रस्त्यावर व चौकात लेन मार्किंग, भिंतीवर चित्रीकरण, अतिक्रमणमुक्त फूटपाथ केले जात आहे. त्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पुढील काही दिवसांत ही कामे पूर्ण केली जाणार आहे.
पाहुणे लुटणार सफारीचा आनंद
‘जी-२०’ परिषदेसाठी येणारे परदेशी पाहुणे दोन ते तीन दिवस उपराजधानीत मुक्कामी राहणार आहे. यादरम्यान ते पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन सफारीचा आनंद घेणार आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.
फुटाळा तलावावर घेणार जेवणाचा आस्वाद
नागपूरच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या फुटाळा तलाव येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कारंजे, लाईट व ‘लेसर मल्टिमीडिया शो’ तयार करण्यात आला. परदेशी पाहुणे या शोचा आनंद लुटणार आहे तसेच त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था येथे करण्याचे नियोजन सुरू आहे.