अखेर नागपूर विद्यापीठाने २० टक्के शुल्कवाढ केली रद्द; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 11:08 AM2022-08-30T11:08:52+5:302022-08-30T11:12:53+5:30

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गोंधळ, भाजयुमोचे कार्यकर्ते धडकले बैठकीत

Huge relief to students as Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University cancels 20 percent fee hike | अखेर नागपूर विद्यापीठाने २० टक्के शुल्कवाढ केली रद्द; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

अखेर नागपूर विद्यापीठाने २० टक्के शुल्कवाढ केली रद्द; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून केलेली २० टक्के शुल्कवाढ रद्द केली. आता विद्यार्थ्यांना जुन्या निर्णयानुसारच महाविद्यालयांचे शुल्क अदा करावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर विद्यापीठाने हा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध होत होते. काही दिवसांपूर्वीच युवक कॉंग्रेस व एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या मागणीसाठी आंदोलन केले होते. सोमवारी दुपारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. याची माहिती होताच भाजयुमोचे कार्यकर्ते विद्यापीठाच्या अंबाझरी येथील मुख्य परिसरात पोहोचले. त्यांनी परिसरातच निदर्शने केली. त्यानंतर कार्यकर्ते थेट ज्या सभागृहात व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरु होती त्या बैठकीतच धडकले.

भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, प्रदेश सचिव कल्याणी देशपांडे व शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनकर्ते बैठकीत पोहोचताच त्यांनी फी वाढीच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, कोविड संक्रमणानंतर आता कुठे परस्थिती सुरळीत येत आहे. अशा परिस्थितीत फी वाढ करणे योग्य नाही. ती तातडीने मागे घेण्यात यावी. आंदोलनकर्ते सभागृहातच धरण्यावर बसले. यावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी त्यांना फीवाढीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. काही वेळानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले, शुल्कवाढीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंदोलनात प्रदेश सदस्य देवा डेहणकर, रितेश राहाटे, शहर महामंत्री सचिन करारे, दीपांशू लिंगायत, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, नीलेश राऊत, सन्नी राऊत, पंकज सोनकर, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे शहर संयोजक संकेत कुकडे, सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, शिवाम पंढरीपांडे, प्रशांत बघेल, साहिल गोस्वामी, प्रणित पोचमपल्लीवार, कौस्तुभ बैतुले उपस्थित होते.

Web Title: Huge relief to students as Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University cancels 20 percent fee hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.