हम सब 'खालिस'ही है, अलगसे खलिस्तान की जरूरत नहीं; अमृतपाल प्रकरणाचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 08:09 PM2023-03-24T20:09:45+5:302023-03-24T20:28:38+5:30
Nagpur News ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे. पंजाबमधील अमृतपाल प्रकरणाने एकीकडे पोलिस, तसेच तपास यंत्रणांची धावपळ वाढविली आहे. दुसरीकडे देशभरातील शीख समुदायातही अस्वस्थता निर्माण केली आहे. अशीच अवस्था नागपुरातील शीख बांधवांची आहे. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात आहे आणि वावड्या उठवल्या जात आहे, त्या चुकीच्या असल्याचे मत शीख समुदायातील जुने जाणते, मान्यवर व्यक्त करीत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून पंजाबमधील कट्टर खलिस्तानवादी अमृतपाल प्रकरणात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कधी त्याला अटक केली, तर कधी तो फरार आहे. तो विदेशात पळाला, पंजाब, हरयाणामध्येच दडून आहे, तर तो नागपूरमार्गे नांदेडमध्ये आला, मध्य भारतात त्याला शरणागती मिळाल्याच्याही उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे नागपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील शीख बांधव कमालीचे अस्वस्थ आहेत. बाबा बुढ्ढाजीनगरातील गुरुद्वारा कमिटीचे माजी प्रधान आणि धर्म प्रचार समितीचे अध्यक्ष मलकितसिंग बल (वय ६५) यांच्याशी या संबंधाने चर्चा केली असता ते म्हणाले, केवळ एका व्यक्तीमुळे अवघ्या शीख समुदायाला बदनाम करणे योग्य नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शीख समुदायाचा त्याग, शाैर्य आणि बलिदान सर्वांना माहिती आहे. ते वेगळे सांगण्याची गरज नाही. कुण्या एका व्यक्तीने देशविरोधी भूमिका घेत काही मत मांडले म्हणजे, ते सगळ्या समुदायाचे मत नसते, असे स्पष्ट करतानाच मलकितसिंग म्हणाले, सध्या काय सुरू आहे, तेच कळत नाही. एक व्यक्ती अनेक वर्षे देशाबाहेर राहते. नंतर देशात परतते. नशा सोडविण्याचे काम हाती घेतल्यामुळे तिच्याशी अनेक जण जुळतात अन् नंतर तो थेट खलिस्तानची मागणी करतो. त्याची ही भूमिका जशी संशयास्पद आहे, तसाच प्रकार तपास यंत्रणांच्या बाबतीतही आहे. त्यांनी अमृतपालची माहिती आधीच का काढून ठेवली नाही, त्याच्यावर आधीच का कारवाई केली नाही, असा प्रश्नही बल यांनी उपस्थित केला.
बाबा दीपसिंगनगर गुरुद्वारा समितीचे माजी अध्यक्ष गुरुविंदर सिंग ऊर्फ गुल्लू सरपंच यांनीदेखील या संबंधाने तीव्र भावना व्यक्त केल्या. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत ठीक आहे. राजकारण करणे योग्य नाही. ड्रग्जमाफियांनी (नशेचे साैदागर) पंजाबला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करून युवा पिढीचा बचाव करण्याची गरज आहे. वेगळ्या खलिस्तानची गरजच नाही, असे गुल्लू सरपंच म्हणाले. या एकूणच प्रकाराबाबत शीख समुदायाची होत असलेली बदनामी क्लेशदायक असल्याचेही ते म्हणाले.
ही नवीन दुकानदारी
जगजित सिंग नामक व्यक्ती ५० वर्षांपूर्वी अमेरिकेत राहून खलिस्तानची मागणी करायचा. खलिस्तानचा अध्यक्ष म्हणूनही त्याने स्वत:ला घोषित केले होते. त्याने खूप नाैटंकी केली. अखेर तो काही वर्षांपूर्वी उडमत टांगा (पठाणकोट)ला स्वगृही परतला आणि नंतर त्याचे निधन झाले. आता परत ही नवीन दुकानदारी सुरू झाल्याचे मलकितसिंग प्रधान यांनी म्हटले आहे. शीख समुदायाचे मूळ शाैर्य, त्याग, बलिदान आणि सेवेत आहे. त्यामुळे वेळोवेळी सुरू होणाऱ्या अशा नवनव्या दुकानदारीला स्थान नसल्याचेही बल यांनी म्हटले आहे.