सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या पायदानात आले मुंडके :नागपूर रेल्वेस्थानकात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:26 PM2019-02-23T22:26:01+5:302019-02-23T22:27:45+5:30
सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून नागपुरात आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. दरम्यान काजीपेठ लोहमार्ग पोलिसांनी नागपुरात येऊन हे मुंडके काजीपेठला घेऊन गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून नागपुरात आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. दरम्यान काजीपेठ लोहमार्ग पोलिसांनी नागपुरात येऊन हे मुंडके काजीपेठला घेऊन गेले.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर १२७७१ सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस सकाळी ८.१५ वाजता आली. या गाडीची तपासणी करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना इंजिनजवळील महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले असल्याचे आढळले. लगेच त्यांनी याची सूचना उपस्टेशन व्यवस्थापक आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हे मुंडके सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात फसले होते. मुंडके बाहेर काढले असता कानाच्या वरील भागाला मार लागल्याचे आणि कपाळ फुटल्याने कानातून रक्त निघाल्याचे दिसले. लोहमार्ग पोलिसांनी हे मुंडके मेयो रुग्णालयाच्या शितगृहात ठेवले. दरम्यान काजीपेठ येथे एका व्यक्तीचे धड आढळल्याचे समजताच लोहमार्ग पोलिसांनी काजीपेठ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये अडकून मुंडके नागपुरात आल्याची माहिती दिली. लगेच काजीपेठ लोहमार्ग पोलीस नागपूरला निघाले. सायंकाळी ५ वाजता ते मुंडके घेऊन काजीपेठला रवाना झाले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.