मेडिकलमध्ये लवकरच 'ह्युमन मिल्क बँक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:42 PM2020-02-25T23:42:41+5:302020-02-25T23:44:20+5:30
बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार नुकतीच शासकीय रुग्णालयांची तपासणी झाली. यातील निवडक शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टराना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले. यात नागपूर मेडिकलच्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे. यामुळे मेडिकलमध्ये लवकरच ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू होण्याची शक्यता आहे.
काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. अमृतासमान असलेलं आईच्या दुधापासून नवजात अर्भक वंचित राहतात. अनाथालये आईच्या दुधाची तहान दुधाचे पावडर, बाटली किंवा बालान्नाने (बेबी फूड) भागवितात. यामुळे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणून ह्युमन मिल्क बँकची मागणी अनाथालयांकडून होत आली आहे. याशिवाय काही मातांना बाळाला जन्म दिल्यानंतरही दूध येत नाही. यासाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ मदतीचे ठरते. सुरुवातीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ही ‘मातृ दुग्ध पेढी’ होणार होती. परंतु मेयो प्रशासनाने जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्ताव बारगळला. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले. यावर काही आमदारांनी पावसाळी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले. याची दखल तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली. १७ जून २०१९ रोजी यासंदर्भात त्यांनी मुंबईला बैठक घेतली. यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आदी सूचना एका पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनाही दिल्या. त्यानुसार नागपूरच्या मेयोसह मेडिकल व डागा रुग्णालयाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला. दरम्यानच्या काळात ‘राष्ट्रीय हेल्थ मिशन’च्या (एनएचएम) पथकाने मेडिकलला भेट देत ‘ह्युमन मिल्क बँक’साठी लागणाऱ्या जागेचीही पाहणी केली. सोमवारी मेडिकलला यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले. प्रशिक्षणासाठी तीन डॉक्टरांना मुंबईच्या सायन
हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा सूचना होत्या. त्यानुसार विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांच्यासह दोन डॉक्टर प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. नागपुरातून केवळ मेडिकलचीच निवड झाल्याचे समजते.
या बालकांना होईल फायदा
आईच्या दूधापासून पोरकी झालेली नवजात मुले, दूध न येणे, याशिवाय आईला क्षयरोगाची बाधा असणे, कावीळ, एड्स, इतर मानसिक आजारांची लागण होणे, झोपेची औषधे, कॅन्सरवरील औषधे, सल्फा, टेट्रासायक्लीन, इस्ट्रोज ही औषधे चालू असणे, स्तनात गळू झाल्यास आदी कारणांमुळे आईच्या दुधापासून बालके वंचित राहतात. अशा बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’चा पर्याय आहे. मेडिकलमध्ये ही दुधाची पेढी होणार असल्याने याचा मोठा फायदा बालकांना होणार आहे.