मानवाधिकाराचे उल्लंघन
By admin | Published: April 2, 2015 02:31 AM2015-04-02T02:31:32+5:302015-04-02T02:31:32+5:30
मंगळवारी पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पाच कच्चे कैदी पळून गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी बडी गोल बराक क्रमांक सहामधील इतर बंद्यांना अमानुषपणे मारहाण करून ...
नागपूर : मंगळवारी पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पाच कच्चे कैदी पळून गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी बडी गोल बराक क्रमांक सहामधील इतर बंद्यांना अमानुषपणे मारहाण करून सर्रास मानवाधिकाराचे उल्लंघन केले.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दीपक चंदन पांडे नावाच्या एका न्यायाधीन बंद्याला नियमित पेशीसाठी कारागृहातून न्यायालय क्रमांक ७ येथे आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपल्या वकिलाला झालेल्या अमानुष मारहाणीचा थरार कथित केला. दीपक पांडे हा ‘रॉबरी’चा आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान, कळमना, सदर, सीताबर्डी, जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. काहींमध्ये तो निर्दोष आहे.
मारहाणीमुळे या बंद्याचे दोन्ही हात सुजलेले आहेत. त्याच्यावर लाठ्या तुटेपर्यंत प्रहार करण्यात आले. त्याचा आणखी एक सहकारी मारहाणीत गंभीर जखमी झालेला आहे.
प्राप्त माहितीनुसार बराक क्रमांक सहामध्ये चार रांगांमध्ये बंदी झोपतात. रांगेला कैद्यांच्या भाषेत ‘कमान’ म्हणतात. प्रत्येक कमानीत ५० बंदी असतात. शेवटच्या चौथ्या क्रमांकाच्या कमानीत ‘भाई’ लोक झोपतात.
पळून गेलेले पाचही बंदी याच रांगेत झोपलेले होते. त्यांच्यासोबत दीपक पांडे हा झोपलेला होता. सकाळी बंदी पळाल्याची वार्ता समजताच येथील सुरक्षा रक्षकांनी चौथ्या क्रमांकाच्या कमानीतील सर्वच बंद्यांना दंडे तुटेपर्यंत अमानुषरीत्या मारहाण केली. आम्हाला सतर्क का केले नाही, असे हे रक्षक त्यांना विचारत होते. (प्रतिनिधी)