मकरधोकडा शिवारात आढळली ‘मानवी कवटी’; तर्कवितर्कांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 12:24 PM2021-12-10T12:24:27+5:302021-12-10T12:33:11+5:30
मकरधोकडा येथून एक ९ वर्षीय बालिका गायब झाल्यानंतर अगदी त्याच परिसरातील काही अंतरावर एक मानवी कवटी व हाडे आढळून आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड तालुक्यातील दत्तनगर मकरधोकडा येथून केवळ एक ते दीड किमी अंतरावर एका शेतात ‘मानवी कवटी’ आढळून आली. बुधवारी (दि. ८) पोलिसांनी हाडे जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा मकरधोकडा शिवार गाठले. शोधमोहिम हाती घेतली. अशातच ज्या परिसरात हाडे आढळून आली अगदी त्या अंतरापासून साधारणत: २०० फुटावर एक मानवी कवटी दिसून आली.
२६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मकरधोकडा दत्तनगर येथील एक नऊ वर्षीय बालिका रहस्यमयरीत्या गायब झाली होती. काव्या ऊर्फ वैष्णवी हिराचंद काळे असे या बालिकेचे नाव असून, तिचा सुगावा अद्याप लागला नाही. शिवाय अगदी शेवटच्या क्षणाला ती ज्या परिसरातून गायब झाली होती, त्या परिसरातील काही अंतरावरच ही हाडे व कवटी आढळून आली. यामुळे ‘त्या’ बालिकेचे तर ही हाडे आणि कवटी नाही ना, असा अंदाज वर्तविला जात आहे.
बुधवारी फॉरेन्सिक लॅबच्या चमूने नमुन्यासाठी हाडे जप्त केली. आज उमरेड पोलिसांना गवसलेल्या मानवी कवटीचा पंचनामा करण्यात आला. ही मानवी कवटी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे हजर होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाअंतीच या हाडे व कवटी प्रकरणाबाबतचा उलगडा होणार आहे.
मामाने दिली माहिती
दरम्यान हरविलेल्या काव्याचा कुठेही सुगावा लागला नाही. अशातच मंगळवारी (दि.७) काव्याचा मामा गणेश नरड हा जनावरे चराईसाठी परिसरात होता. त्याला ठराविक अंतरावर हाडे नजरेस पडली. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी हाडे गवसली तर आज मानवी कवटी आढळून आल्याने प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.