नागपुरात लहान मुलांवर आजपासून मानवी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 10:58 PM2021-06-05T22:58:33+5:302021-06-05T22:59:01+5:30
Vaccination, Human testing on children कोरोनाचा गंभीरतेपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीची मुलांवरील मानवी चाचणीला रविवार, ६ जूनपासून नागपुरात सुरूवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा गंभीरतेपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीची मुलांवरील मानवी चाचणीला रविवार, ६ जूनपासून नागपुरात सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटांतील मुलांवर ही चाचणी केली जाणार आहे. १२० मुलांमधून ५० मुलांची यासाठी निवड करण्यात आली आहे. शनिवारी डॉक्टरांच्या चमूने सहभागी मुलांचे व पालकांचे समुपदेशन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कोरोनाचा पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रविवारपासून सुरू होणाऱ्या लहान मुलांच्या मानवी चाचणीला महत्त्व आले आहे. मोठ्यांना दिली जाणारी भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’लस लहान मुलांना दिली जाणार आहे. वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात १२ ते १८ वयोगटांतील ५० स्वयंसेवक बालकांची निवड करण्यात आली आहे.
१५० मुलांवर होणार चाचणी
डॉ. खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी २ ते ६, ७ ते ११ आणि १२ ते १८ या तीन वयोगटांत विभागण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात ५० मुले-मुलींचा समावेश असणार आहे. प्रत्येक वयोगटात सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची समितीद्वारे निवड केली जात आहे. पहिला डोस ‘०.५ एमएल’चा दिला जाईल. त्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. त्यापूर्वी रक्ताची चाचणी केली जाईल. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक पथक सज्ज आहे. ते फोनद्वारे मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहतील.