नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:00 AM2021-12-10T07:00:00+5:302021-12-10T07:00:02+5:30
Nagpur News हैदराबादच्या ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’या लहान मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला मंजुरी मिळाल्याने महत्त्व आले आहे. मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत पहिल्यांदाच बूस्टर डोसचा समावेश करण्यात आला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘ओमायकॉन’ या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला हा विषाणू कारणीभूत ठरल्यास लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादच्या ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’या लहान मुलांवरील कोरोना लसीचा मानवी चाचणीला मंजुरी मिळाल्याने महत्त्व आले आहे. मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत पहिल्यांदाच बूस्टर डोसचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपुरात यापूर्वी बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात इंजेक्शनच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची चाचणी यशस्वी पार पडली. त्यानंतर आता पुन्हा लहान मुलांमधील मानवी चाचणीला सुरुवात होत आहे. मेडिकलच्या ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागा’ला (पीएसएम) चाचणीसाठी मंजुरी मिळाली आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. उदय नार्लावार यांच्या पुढाकारात ही चाचणी होणार आहे.
- भारतात तयार होणारी तिसरी व्हॅक्सिन
डॉ. नार्लावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. या लसीची १८ वर्षांवरील स्वयंसेवकांवर पहिली आणि दुसरी मानवी चाचणी झाली आहे. या दोन्ही टप्प्यात चाचणीला यश मिळाल्याने तिसरी चाचणी लहान मुलांवर होत आहे.
- देशात १० ठिकाणी चाचणी
लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. दोन्ही गटात प्रत्येकी ४० लहान मुलांचा समावेश असेल. ही लस इंजेक्शनच्या स्वरूपात दिली जाईल. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसानंतर दिला तर तिसरा डोस म्हणजे ‘बूस्टर’ ४२ दिवसानंतर दिला जाईल. सर्व डोस ‘०.५ एमएल’चे राहतील.
- मुलांना चाचणीत सहभागी करून घ्या
‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’लसीच्या दोन चाचण्या १८ वर्षांवरील लोकांवर झाल्या असून, त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लहान मुलांवर होत आहे. ५ ते १८ या वयोगटातील ज्या मुलांना कोरोना झालेला नाही त्यांचा समावेश यात केला जाणार आहे. नोंदणी सुरू झाली असून अधिक माहितीसाठी पालकांना मेडिकलच्या ‘पीएसएम’ विभागात संपर्क साधता येईल.
- डॉ. उदय नार्लावार, प्रमुख पीएसएम विभाग मेडिकल