'कॅटरिंग'च्या नावाखाली मानवी तस्करी; 'त्या' ऑडिओ क्लीपमधून ड्रग्ज व तरुणींच्या तस्करीचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 03:40 PM2022-04-05T15:40:56+5:302022-04-05T16:02:54+5:30

दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार एकमेकांना अपहरण करून हत्या करण्याची धमकी देत असल्याच्या दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

human trafficking and drug smuggling racket busted in nagpur through leaked audio clip | 'कॅटरिंग'च्या नावाखाली मानवी तस्करी; 'त्या' ऑडिओ क्लीपमधून ड्रग्ज व तरुणींच्या तस्करीचा खुलासा

'कॅटरिंग'च्या नावाखाली मानवी तस्करी; 'त्या' ऑडिओ क्लीपमधून ड्रग्ज व तरुणींच्या तस्करीचा खुलासा

Next
ठळक मुद्देदोन टोळ्यांमधील सहा कुख्यात गुंड गजाआड, अनेक फरार

नागपूर : ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील धमकीच्या ऑडिओ क्लीपच्या वृत्ताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, कुख्यात गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील सहा कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या प्राथमिक चौकशीतून या टोळ्यांमधील गुन्हेगार महिला, मुलींचा वेश्या व्यवसायासाठी तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी वापर करीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सोमवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेला अभिषेक पांडे हिंगण्यात राहतो. तो साथीदारांच्या मदतीने इव्हेन्ट मॅनेजमेंट आणि कॅटरिंगचे काम करतो. त्या निमित्ताने तो गरीब घरातील देखण्या मुलींना चांगला पगार देण्याचे आमिष दाखवून आपल्या ग्रुपमध्ये ओढतो. त्यांना तो इव्हेन्टच्या नावाने ओडिशा संभलपूरमध्ये नेतो. तेथून तो मुलींच्या पर्समध्ये गांजाची पाकिटं ठेवून नागपुरात आणतो आणि येथून त्याची विक्री करतो.

त्याच्या संपर्कातील एक अल्पवयीन मुलीसह दोघी कुख्यात गुंड दत्तू गभणे ऊर्फ खाटीक याच्या संपर्कात आल्या. त्यांना गेल्या आठवड्यात दत्तू तसेच त्याचे साथीदार सचिन इंगळे, निखिल बांगडने हुडकेश्वरमधील विक्की भोसलेच्या हॉटेलमध्ये नेले. एकीशी त्यांनी शरीरसंबंध जोडले, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विक्की भोसलेने लगट सुरू केली. तिने विरोध केल्याने तिला मारहाण केली. तिने तिचा बॉयफ्रेण्ड अभिषेक पांडेला ही माहिती दिली.

अभिषेकने तिला तेथे येऊन सोबत नेले. त्यानंतर त्याने दत्तूच्या साथीदाराला फोन करून अपहरण करून हत्या करण्याची तसेच गांजा तस्करीची पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्याची धमकी दिली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून दत्तूने पांडेला फोन केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना घाणेरड्या शिव्या देऊन अपहरण, हत्या करण्याची, गोळ्या मारण्याची धमकी दिली.

या दोन्ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. ते वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी (दि. ४) ठळकपणे प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी क्लीपची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांचे लोकेशन ट्रेस करून आधी अभिषेक पांडे तसेच सोनू ठाकूरला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजाही जप्त केला. तर, दुसऱ्या पोलीस पथकाने आरोपी गभने ऊर्फ खाटिक, सचिन इंगळे, विक्की भोसले आणि निखिल बांगडेला अटक केली. दोन्ही टोळ्यांमधील पाच ते सात गुन्हेगार मात्र फरार झाले.

पांडे टोळीकडून मानवी तस्करी

पांडेच्या टोळीकडून मुलींच्या माध्यमातून गांजाची तस्करी केली जात असल्याचे चाैकशीत पुढे आले. तो यासाठी तरुणींसह अल्पवयीन मुलींची तस्करी (ह्युमन ट्रॅफिकिंग) करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असावा, असाही संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे त्याच्या टोळीवर दाखल केले.

बलात्काराचा प्रयत्नासह वेगवेगळे गुन्हे

दत्तू खाटिक हा स्वत: खतरनाक गुन्हेगार असून, त्याचा साथीदार सचिनही हत्येच्या गुन्ह्याचा आरोपी आहे. दत्तू जामिनावर आल्यापासून गांजाची तस्करी करतो. नंतर त्याने सेक्स रॅकेटही सुरू केले. त्यातून तो नागपूरसह बाहेरगावच्याही अनेक महिला-मुलींच्या संपर्कात आहे. पोलिसांनी त्याच्यावरही बलात्काराचा प्रयत्नासह वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहे.

ती मुलगी दहावीची विद्यार्थिनी

जिच्यावरून गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये गँगवॉरचा धोका निर्माण झाला होता, ती मुलगी पांडेची गर्लफ्रेण्ड दहावीची विद्यार्थिनी असून, सोमवारी तिचा पेपर होता. तो संपल्यानंतर तिला गोंदिया जिल्ह्यातून आज नागपुरात येण्याची सक्ती दत्तूच्या टोळीने केली होती. अर्थात आज तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा कट खाटिक टोळीने केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अटक केल्याने सामूहिक बलात्कारासोबतच अपहरण आणि गँगवॉरचेही गंभीर गुन्हे टळले.

Web Title: human trafficking and drug smuggling racket busted in nagpur through leaked audio clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.