‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:27 AM2020-07-28T05:27:44+5:302020-07-28T05:28:01+5:30
गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये संशोधन : २५, ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला दिली लस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना राज्यात नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. २५ व ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला सोमवारी लस देण्यात आली. त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. पुढील १४ दिवसांपर्यंत यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास नसल्यास कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
भारतीय औषधी महानियंत्रकने (डीसीजीआय)े ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. या प्रकल्पात भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्था सहभागी आहेत. २४ जुलैला दिल्लीतील एम्समध्ये ३० वर्षे व्यक्तीला लस देऊन मानवी चाचण्यांना सुरुवात झाली.
मंगळवारी पुन्हा पाच व्यक्तींवर मानवी चाचणी करण्यात येईल. त्यानंतर जसजसे रक्त तपासणीचे अहवाल उपलब्ध होतील तसे संबंधितांना बोलावून लस दिली जाईल. आम्ही ५० व्यक्तींना लस देण्याची तयारी केली आहे. - डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर हॉस्पिटल