मानवधर्म : ड्रीम ट्रस्टची मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 08:05 PM2020-06-29T20:05:25+5:302020-06-29T20:06:51+5:30
कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे. अशा सुमारे ३०० कुटुंबांना हे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. ट्रस्टचे डॉ. शरद पेंडसे यांनी ही माहिती दिली.
देशातील लॉकडाऊन अंशत: शिथिल होताच ट्रस्टकडे इन्सलिन घेण्यासाठी येणाऱ्या मधुमेहग्रस्त मुलांची संख्या वाढली. दरम्यान, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या मुलांच्या पालकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यातून मधुमेहग्रस्त मुलांची कुटुंबे लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडली असल्याचे पुढे आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची रोजची कमाई बंद झाली. काहीजण आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन खेळणी, कपडे व दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत होते. काहीजण चहाटपरी, केसकर्तन इत्यादी छोटे व्यवसाय करीत होते. लॉकडाऊन काळात त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे अर्थार्जनही बंद होते. परिणामी, त्यांना जीवन जगणे कठीण झाले. राज्य सरकारच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नधान्य, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. असे असले तरी या कुटुंबांना अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, ही बाब लक्षात घेता ड्रीम ट्रस्टने मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला व त्यावर तातडीने अंमलबजावणीही सुरू केली. या अर्थसाहाय्यामुळे संबंधित कुटुंबांना २-३ महिने समाधानाने जगता येईल व या काळात ते आर्थिक संकटातून बाहेर पडून जीवनाची गाडी रुळावर आणू शकतील, असा विश्वास डॉ. शरद पेंडसे यांनी व्यक्त केला.