उपराजधानीत १६ वर्षांखालील शेकडो मुले ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 09:59 AM2021-04-21T09:59:34+5:302021-04-21T10:00:55+5:30
Coronavirus Nagpur news कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीत भीषण स्थिती निर्माण झाली असताना लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीत भीषण स्थिती निर्माण झाली असताना लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ वर्षांखालील बाधित मुला-मुलींची संख्या मर्यादित होती. मात्र एप्रिलमध्ये ही संख्या शेकडोहून अधिक झाली आहे. अद्यापपर्यंत मृत्यूची नोंद झाली नसली तरी अनेक मुले ‘कॅरिअर’ ठरत आहेत.
‘कोरोना’मुळे तरुणांच्या बाधित होण्याचे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेक कुटुंबांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक सदस्य ‘पॉझिटिव्ह’ येत आहेत. नवीन ‘स्ट्रेन’मुळे या लाटेत लहान मुलांवरदेखील परिणाम होत असून तेदेखील बाधित होत आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत मेयो, मेडिकलमध्ये शून्य ते १२ वर्षांखालील ३५ मुले पॉझिटिव्ह आली. यातील १०, तर जन्मजात बाळं होती. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या वाढली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी मुलांमुळे इतरांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा धोका आहे. ही संख्या शेकडोंमध्ये असून, यातील बहुतांश मुले ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. कोरोनाबाधित जास्तीतजास्त लहान मुलांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये जास्त ताप, शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरणे व इतर लक्षणे दिसून येतात. यावर तातडीने उपचार करणे गरजेचे ठरते.
सौम्य लक्षणांची संख्या अधिक
पूर्वी बाहेर असलेला विषाणू घराच्या आत शिरला आहे. यामुळे आणखी काळजी घेण्याची गरज आहे. घरी कोणी पॉझिटिव्ह असल्यास मुलांना होम आयसोलेशन करायला हवे. दोन वर्षांवरील मुलगा असेल, त्यांनी मास्क लावायला हवे. बहुसंख्य लहान मुलांना एकतर लक्षणे राहत नाहीत किंवा राहिली तरी सौम्य लक्षणे असतात. यामुळे तातडीने औषधोपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
लस नसल्याने काळजी आवश्यक
केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांवरील लसीसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. अमेरिकेसह काही देशांमध्ये लहान मुलांवरील लसींचे परीक्षण सुरू आहे. मुलांसाठी अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे मुलांची काळजी जास्त आवश्यक आहे.