रेल्वे तिकिट ‘रिफंड’साठी आलेले शेकडो नागरिक गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:07 AM2020-05-29T01:07:20+5:302020-05-29T01:09:23+5:30
तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.
नागरिकांनी उन्हाळ्यात प्रवास करण्यासाठी मार्च महिन्यापूर्वीच तिकिटांचे आरक्षण केले होते. परंतु रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या. दरम्यान रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकिटाची १०० टक्के रक्कम परत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तीन महिने प्रवाशांचे पैसे रेल्वे प्रशासनाकडे अडकले होते. मागील चार दिवसापासून रेल्वे प्रशासनाकडून तिकिटाची रक्कम परत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आपली रक्कम परत घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी करीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. त्यातून आलेले पैसे तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना परत करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते. परंतु कोरोनामुळे बहुतांश नागरिक तिकिटांचे आरक्षण करीत नसल्यामुळे रेल्वेला बुकिंगच्या माध्यमातून खूप कमी रक्कम मिळत आहे. उलट तिकीट रद्द करणारे असंख्य प्रवासी येत असल्यामुळे त्यांना देण्यासाठी रक्कमच उरत नसल्याची स्थिती आहे. गुरुवारी सकाळी इतवारी आणि कामठी रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांनाही हाच अनुभव आला. आरक्षण खिडक्यांवर रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम देण्यासाठी रक्कमच उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना आल्यापावली परत जावे लागले.
टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येते रक्कम
‘रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांसाठी रेल्वे आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या. यातच प्रवाशांना रिफंड देणे सुरु करण्यात आले. परंतु बुकिंग कमी आणि रिफंड घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे रक्कम पुरत नाही. रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने रक्कम पाठविण्यात येत आहे. प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षण कार्यालयात गर्दी करू नये.’
के. व्ही. रमणा, ‘सिनिअर डीसीएम’, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग