नागपुरात कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी; ६ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:17 PM2022-01-03T22:17:04+5:302022-01-03T22:18:28+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ जूननंतर पहिल्यांदाच दैनंदिन बाधितांची संख्या १३३ झाली. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या ४ रुग्णांचीही भर पडली.

Hundreds of corona patients in Nagpur; 6 year old child infected with omecron | नागपुरात कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी; ६ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण

नागपुरात कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी; ६ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तासांत १३३ रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या ४ रुग्णांची पडली भर

नागपूर : कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. सोबतच ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने काळजी वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ जूननंतर पहिल्यांदाच दैनंदिन बाधितांची संख्या १३३ झाली. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या ४ रुग्णांचीही भर पडली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९४,३२६ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ५,४०९ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण २.५ टक्क्यांवर आले आहे. शहरात झालेल्या ३,७९२ चाचण्यांपैकी १०५ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १६१७ चाचण्यांपैकी २० बाधित रुग्ण आढळून आले. जिल्हा बाहेर ८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात बाधितांची एकूण संख्या ३,४१,०६४, ग्रामीणमध्ये १,४६,३०८ तर जिल्ह्याबाहेर ६,९५४ झाली आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे.

६ वर्षांच्या मुलालाही ओमायक्रॉन

विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या ४ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल आज पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (एनआयव्ही) प्राप्त झाला. यात ६ वर्षांचा मुलाचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, युगांडा येथून हा मुलगा आपल्या कुटुंबासह १९ डिसेंबर रोजी मुंबईत परतला. तेथून सडक मार्गाने नागपुरात आला. येथे जनुकीय तपासणीसाठी नमुने देऊन अमरावतीला निघून गेला. आज त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सौदी अरेबिया प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय पुरुषालाही या व्हेरिएंटची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला नागपूर ‘एम्स’मध्ये भरती करण्यात आले आहे. इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याने २४ तारखेपासून एम्समध्ये भरती होती. रविवारी आरटीपीसीआरची चाचणी निगेटिव्ह आल्याने सुटी देण्यात आली. परंतु आज ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सौदी अरेबिया प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या ३६ वर्षीय पुरुष रुग्णालाही या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे पुढे आले.

-२१४ दिवसानंतर रुग्णसंख्या शंभरीपार

नागपूर जिल्ह्यात ७ जून रोजी कोरोनाचे १३४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली नव्हती. परंतु तब्बल २१४ दिवसानंतर आज दैनंदिन रुग्णसंख्या १३३ वर पोहोचली. येत्या दिवसांत या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शहरात कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५२६ झाली आहे. यात शहरातील ४४८, ग्रामीणमधील ४५ व जिल्ह्याबाहेरील ३३ रुग्ण आहेत.

Web Title: Hundreds of corona patients in Nagpur; 6 year old child infected with omecron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.