नागपुरातील दीड लाख घरात होणार कुष्ठरोग सर्वेक्षण; ४२४ तज्ज्ञांची टीम नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 09:13 PM2017-09-05T21:13:51+5:302017-09-05T21:18:10+5:30
प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत ५ ते २० सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
नागपूर, दि. 5 - प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत ५ ते २० सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. या अंतर्गत नागपूर शहरातील दीड लाख घरातील तब्बल ७ लाख ५८ हजार व्यक्तींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी ४२४ तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत.
या शोध मोहिमेदरम्यान संशयित कुष्ठरुग्णांच्या शरीराच्या ६० टक्के भागाची तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरोग रुग्ण आढळल्यास त्यावर मोफत औषधोपचार करण्यात येणार असून कुष्ठरोग निर्मुलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येतील. या सर्वेक्षणासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे.
मोहिमेचा शुभारंभ करताना महापौर जिचकार म्हणाल्या, समाजातील कुष्ठरुग्णांना शोधून त्यांना बहूविध औषधोपचाराने बरे करायचे आहे. याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत:मध्ये कुष्ठरोग आजाराविषयी लक्षणे वाटल्यास रुग्णालयामध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महापालिकेचे अप्पर आयुक्त रविंद्र कुंभारे, उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिवाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर, डॉ. अनंत हजारे, डॉ. हेमलता वर्मा आदी उपस्थित होते