सव्वानऊ लाखांचा ऐवज पळविणारा गजाआड
By admin | Published: May 24, 2017 02:39 AM2017-05-24T02:39:26+5:302017-05-24T02:39:26+5:30
प्रतापनगरातील एका महिलेचा सव्वा नऊ लाखांचा ऐवज पळवून नेणाऱ्या आॅटोचालकाच्या अवघ्या २४ तासात
गुन्हे शाखेची कामगिरी : चोरलेला ऐवज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगरातील एका महिलेचा सव्वा नऊ लाखांचा ऐवज पळवून नेणाऱ्या आॅटोचालकाच्या अवघ्या २४ तासात मुसक्या बांधण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने बजावली.
रविवारी भरदुपारी १२.२० च्या सुमारास ही घटना घडली होती. प्रेरणा अमित पिसे (वय २८), त्यांची छोटी मुलगी दिवीशा आणि आई सुनीता देशमुख यांच्यासह १३ मे रोजी मुलताई (बैतूल) येथील आजीकडे लग्नाच्या निमित्ताने गेल्या होत्या.
तेथून रविवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास त्या बसने नागपुरात आल्या. गणेश टेकडी मंदिर समोरच्या मध्य प्रदेश बसस्थानकासमोर उतरल्यानंतर त्यांनी घरी येण्यासाठी एक आॅटो ठरविला. आॅटोने त्या प्रतापनगरातील आपल्या आदर्श कॉलनीतील घरी आल्या. घरासमोर आॅटोतून उतरताना त्यांच्या आईने एक सुटकेस व एक छोटी बॅग खाली घेतली. तर, प्रेरणा यांनी आपल्या लहानग्या मुलीला कडेवर घेतले.
आॅटोत दोन मोठ्या बॅग होत्या. त्या खाली उतरवायच्या असतानाच आरोपी आॅटोचालकाने आॅटो मागेपुढे करून तेथून धूम ठोकली. आॅटोचालकाने पळविलेल्या दोन बॅगपैकी एका बॅगमध्ये सोन्याच्या माळ, नेकलेस आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे. तर दुसरीत २५ हजारांचे कपडे असा एकूण सव्वा नऊ लाखांचा ऐवज होता.
प्रेरणा यांनी प्रतापनगर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवताच सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी गुन्हा दाखल करून लगेच आॅटोचालकाचा शोध सुरू केला. शहरातील अन्य पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेलाही त्याची माहिती दिली.
आरोपीच्या मुसक्या बांधल्या
या धाडसी चोरीची माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, एएसआय राजकुमार देशमुख, हवालदार सुनील चौधरी, अफसरखान पठाण, अमित पात्रे, राहुल इंगोले, नीलेश वाडेकर, श्रीकांत पटणे यांनी मोठ्या शिताफीने आरोपीचा पत्ता काढला. आरोपी सुनील सुदाम मेश्राम (वय ५०, रा. काशीनगर) हा शताब्दी चौकातील कुमार बंधू सभागृहासमोर राहत असल्याचे कळताच तेथे जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने चोरलेले सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ९ लाख २२ हजारांचा ऐवज तसेच एक लाख रुपये किमतीचा आॅटोही जप्त केला.