शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभराे आंदाेलन
By निशांत वानखेडे | Published: January 23, 2024 06:31 PM2024-01-23T18:31:05+5:302024-01-23T18:31:33+5:30
सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास याेजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहे.
नागपूर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदाेलनाला ५० दिवसांचा काळ लाेटला आहे. मात्र सरकारकडून कुठलीही दखल हाेत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष पसरला आहे. मंगळवारी नागपुरात शेकडाे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्हेरायटी चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन करीत स्वत:ला अटक करवून घेतली. मात्र या आंदाेलनामुळे चाैकातील वाहतुकीचा गाेंधळ उडाला हाेता.
सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास याेजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहे. वेळाेवेळी त्यांच्या मानधनात वाढ झाली पण ती महागाईच्या प्रमाणात तुटपुंजी हाेती. २०२३ मध्येही १५०० रुपयांची वाढ करण्यात आली पण अत्यल्प आहे. तेव्हापासून हजाराे कर्मचारी निवृत्त झाल्या पण निवृत्तीनंतर त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. शिवाय कुपाेषण नियंत्रण, लसीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची सेवा घेतली जाते पण लाभ मिळत नाही. २०१४ मध्ये सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा शासन निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. २००५ मध्ये पेन्शनबाबतचा पहिला शासन निर्णय सन झाला, पण २०२४ येऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
ग्रॅज्युईटी बाबत सुप्रिम कोर्टाचा आदेश होवून आता दोन वर्षे होतील, पण त्यावरही पाऊल उचलले गेले नाही. कर्मचाऱ्यांचे टीए बिल, नवीन माेबाईल व काेराेना काळातील सुट्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेत पगारवाढ करून शासकीय याेजनांचा लाभ द्यावा, अशा मागण्या आंदाेलनाद्वारे केल्या जात आहेत. निर्णय हाेईपर्यंत संप व आंदाेलन मागे न घेण्याची घाेषणा आयटकने केली आहे. सरकारने केवळ संघटनांचा, युनियन्सचा द्वेष न बाळगता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी आयटकचे काॅ. श्याम काळे यांनी केली आहे.
आंदाेलनात आयटकच्या सचिव ज्योती अंडरसहारे, सरचिटणीस वनिता कापसे तसेच रेखा कोहाड, शालिनी मुरारकर, उषा चारभे, मंगला रंगारी, दिर्घणा कावळे, विशाखा पाटील, आशा पाटील, सीमा गजभिये, शीला लोखंडे, सुरेखा पवार, शैला काकडे, शीला पाटील, उषा सायरे, सुनीता मानकर, कुमुद नवकरीया, प्रमिला चौधरी आदींचा सहभाग हाेता.