'त्यांना' शिकायचे आहे, 'आधार' मिळेल का?; रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांचे भवितव्य अंधारात
By मंगेश व्यवहारे | Published: June 30, 2023 11:48 AM2023-06-30T11:48:26+5:302023-06-30T11:49:37+5:30
जन्मदाखला नसल्याने शाळेत प्रवेशाच्या अडचणी
नागपूर : सरकारने जन्मत:च मुलाचे आधार कार्ड उपलब्ध करण्याची सोय केली आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारच्या माध्यमातून ओळख दिली आहे; पण नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांकडे आधार नसल्याने ते निराधार ठरत आहेत. कारण त्या मुलांच्या पालकांकडे त्यांच्या जन्माचे दाखलेच नाहीत. येथे आजही प्रसूती घरीच होते. टोलीमध्ये गेल्या काही वर्षांपासून खुशाल ढाक नावाचा तरुण शिक्षणाचे बीज रोवत आहे. जन्माचा दाखला नसल्याने त्यांचे आधार कार्ड बनत नसल्यामुळे या मुलांच्या शिक्षणात अडचण येत आहे.
येथे राहणारा हिमेश नरसिम्हा कांबळे १३ वर्षांचा मूकबधिर मुलगा. याच्याकडे आधार नाही म्हणून त्याला शाळेत घेतले गेले नाही. हिमेशला वडील नाहीत. आईच त्याचा सांभाळ करीत आहे. हिमेशचा जन्म घरीच झाला होता. त्यामुळे त्याच्या आईकडे त्याच्या जन्माचा दाखला नाही. त्याचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाही. परिणामी, त्याला विशेष शिक्षण मिळू शकत नाही. हिमेशची व्यथा पुढे आल्यानंतर खुशाल ढाक यांनी ४,५०० लोकवस्तीच्या टोली भागात आधार कार्ड नसलेल्या मुलांचा शोध घेतला. त्यात शेकडो मुले समोर आली. कारण आई- वडील अशिक्षित असल्याने या मुलांचा जन्म त्यांच्या घरीच झाला होता. ३ ते १४ वयोगटातील ही मुले आहेत. खुशाल गेल्या काही वर्षांपासून या भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शाळेत दाखला मिळण्यासाठी सरकारने आधार कार्डची सक्ती केली आहे. यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने त्यांच्या प्रवेशात अडथळा येत आहे.
- प्रवेशात अडथळा येणार नाही
यासंदर्भात शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, आधार नसेल, तर शाळेत प्रवेश नाकारता येत नाही, तर मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाचे प्रमुख डॉ. अतिक खान म्हणाले की, जन्म होऊन एक वर्षापेक्षा जास्त अवधी झाल्यानंतरही झोन कार्यालयात बाळाची नोंद झाली नसल्यास पोलिस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पुढची प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतरच जन्माचा दाखला मिळेल.
- प्रशासन दखल घेणार का?
ही वस्ती अतिशय मागास आहे. मुलांच्या पालकांना शिक्षणाचा गंध नाही. आम्ही पालकांचे मन परिवर्तन करून कुठेतरी येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यात प्रशासनाच्या सहकार्याचीही गरज आहे. छोट्या- छोट्या दस्तावेजामुळे जर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास अडथळा आल्यास, ही मुले कधीच शिकणार नाहीत.
- खुशाल ढाक, सामाजिक कार्यकर्ता