नागपूर कारागृहातील शेकडो कैद्यांना गृहमंत्र्यांच्या ‘कॉल’ची प्रतीक्षा
By नरेश डोंगरे | Published: January 6, 2024 11:32 PM2024-01-06T23:32:32+5:302024-01-06T23:34:34+5:30
तामिळनाडूतील ग्रुपने केली व्यवस्था : यंत्रणा सज्ज, शुभारंभाच्या तारखेकडे लागले डोळे
नागपूर : रुक्ष वातावरणात बोलती बंद झालेल्या अवस्थेत जगणारे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील शेकडो कैदी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'कॉल'ची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत. एकदा त्यांची तारीख मिळाली की, या कैद्यांचेही हरविलेले सूर पुन्हा त्यांच्या कानावर येणार आहेत. त्याचमुळे मध्यवर्ती कारागृहातील शेकडो कैदी कानात जीव आणून गृहमंत्री फडणवीस यांच्या 'कॉल'ची वाट बघत आहेत.
कारागृहाच्या भेसूर भिंतीआड डांबले गेलेल्या कैद्यांना महिनोमहिने आपल्या नातेवाईकांना भेटता, बघता येत नाही. भेटणे बघणेच काय, आपल्या प्रियजणांचा आवाजही ते ऐकू शकत नाहीत. त्यामुळे रुक्ष वातावरणात राहणाऱ्या अनेक कैद्यांचे सूरच हरवल्यासारखे होतात. बहुतांश कैदी एकांतात स्वत:शीच बोलतात. दुसऱ्याशी ते अबोला धरून वागतात. ते फारसे कुणात मिसळत नाही.
गेल्या काही वर्षांत कैद्यांना कारागृहात डांबल्यानंतर त्यांच्यात सुधारणा कशी करता येईल आणि त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल, यावर चर्चा सुरू आहे. विविध कार्यक्रम, उपक्रम, नातेवाईकांची भेट, गळाभेट असे उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीतून कैद्यांमध्ये सकारात्मकता रुजत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे असे उपक्रम आणखी विकसित करण्यात येत आहेत. कैद्यांना आपल्या नातेवाईकांशी, प्रियजणांशी बोलता यावे म्हणून 'टेलिफोन' (क्वॉईन बॉक्स)चीही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, क्वॉईन बॉक्स संपर्कात अनेक अडचणी आल्याने तामिळनाडू आणि केरळमधील काही संस्था-संघटनांनी विविध ठिकाणच्या कैद्यांसाठी स्मार्ट फोनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात करण्यात आली. त्यातील त्रुटी दूर करून आणखी काही नव्या सुधारणांसह राज्यातील येरवडा आणि ऑर्थर रोड तुरुंगात ही संवाद यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. कैद्याचे व्हेरिफिकेशन करून त्याला एक स्वाईप कार्ड उपलब्ध करून दिले जाणार असून, या कार्डला स्वाईप करताच त्याच्या संपर्कातील दोन ते तीन क्रमांक डॅश बोर्डवर दिसतील. त्यातील एक क्रमांक डायल करून कैदी एका वेळी ६ ते १० मिनिटे त्याच्या प्रियजणांशी बोलू शकणार आहे. आठवड्यातून दोन अर्थात महिन्यातून ८ वेळा तो या सुविधेचा लाभ घेणार असून, त्यासाठी १ रुपया प्रतिमिनिट असे शुल्क त्याला अदा करावे लागणार आहे.
कारागृहात लागले २० संच
ऑर्थर आणि येरवडा कारागृहानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात ही सुविधा सुरू केली जाणार असून, त्यासाठी तमिळनाडूतील ॲलन ग्रुपने येथे ठिकठिकाणी २० संच लावले आहे. कैद्यांचे कार्डही तयार झाले आहेत. या सुविधेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे नियोजित शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी त्यांची तारीख मिळावी म्हणून नागपूरसह पुणे मुख्यालयातूनही प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री फडणवीस यांची तारीख मिळताच फोनची घंटी खणखणार आहे. त्यामुळे शुभारंभाच्या कार्यक्रमाची तारीख कळविणारा फोन तातडीने यावा म्हणून मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनासह शेकडो कैदी कानात जीव आणून फडणवीस यांच्या 'कॉल'ची वाट बघत आहेत.