उपचाराविनाच खराब ‘व्हाॅल्व्ह’सह मृत्यूच्या दाढेत जगताहेत शेकडो रुग्ण
By सुमेध वाघमार | Published: September 12, 2023 11:32 AM2023-09-12T11:32:17+5:302023-09-12T11:33:53+5:30
जनआरोग्य योजनेत हृदयाच्या कृत्रिम ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’चा खर्चच बसत नाही
सुमेध वाघमारे
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रित राबवून अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबातील सदस्यांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण देण्याची हमी दिली जात असली, तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. हृदयाचे झडप (व्हाॅल्व्ह) खराब झालेल्या ज्या रुग्णांना कृत्रिम ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ रिप्लेसमेंटची गरज असते त्याची किंमतच योजनेत समाविष्ट किमतीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे नागपूरसह अनेक ठिकाणी ही शस्त्रक्रिया ठप्प पडली आहे. यामुळे शेकडो रुग्ण उपचाराविना हृदयाच्या खराब व्हाॅल्व्हसह मृत्यूच्या दाढेत जगत आहेत.
आपल्या देशामध्ये हृदयातील झडप खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे ‘हुमॅटिक फिवर’, ‘अँटिबायोटिक्स’चा अतिवापर, हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या आतील आवरणाला जंतूसंसर्ग, साठ व त्यावरील वय आदी कारणे आहेत. काहीवेळा जन्मत:च झडपांमध्ये दोष असू शकतो. मानवी हृदयामध्ये ‘मायट्रल’, ‘ट्रायकस्पिड’, ‘पल्मोनरी’ आणि ‘ऑर्टिक’ नावाच्या चार झडपा असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये व डाव्या कप्प्यामध्ये प्रत्येकी दोन झडपा आहेत. सर्वसाधारणपणे या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे अगदी कोमल असतात. या झडपांचे कार्य हृदयातील रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने मार्गस्थ करणे असते. हृदयातील रक्तप्रवाह उलट दिशेने होण्यास त्या प्रतिबंध करतात. झडप खराब झाल्यास ‘व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट’ हाच पर्याय असतो.
- योजनेत १ लाख ४० हजार रुपयेच मंजूर
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत २०२०पासून ‘व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट’ या उपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला. धातू म्हणजे ‘मेटॅलिट व्हाॅल्व्ह’ला १ लाख २० हजार रुपये तर प्राण्यांपासून तयार करण्यात आलेल्या ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ला १ लाख ४० हजार रुपयांचा खर्च मंजूर आहे. परंतु, ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ची किंमतच १ लाख ६० हजारांपासून सुरू होते. शिवाय, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य व औषधांचा खर्च ५० हजारांवर जातो. यामुळे नागपुरातील शासकीयसह खासगी रुग्णालये या योजनेतून ही शस्त्रक्रिया करत नसल्याचे वास्तव आहे.
- या रुग्णांना गरज पडते ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ची
‘मेटॅलिट व्हॉल्व्ह’ बसविल्यास रुग्णाला रोज रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी लागते. यासह इतरही कारणांमुळे ६० वर्षांवरील वय, हृदयविकारासह इतरही गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये हा व्हाॅल्व्ह बसविणे धोकादायक ठरते. त्यांना ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ बसविण्याचा पर्याय सुचवितात.
- शेकडो रुग्ण मृत्यूच्या दाढेत
जनआरोग्य योजनेतील लाभार्थी असलेल्या ६१ वर्षीय मायाचे हृदयाचे झडप खराब झाले आहे. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने झडप बदलण्याचा सल्ला दिला. सोबतच ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’चा खर्च जनआरोग्य योजनेत बसत नसल्याचेही सांगितले. यामुळे मागील चार महिन्यांपासून त्या मृत्यूच्या छायेखाली जगत आहेत. मायासारखे असे शेकडो रुग्ण आहेत.