आजपासून आठ दिवस शेकडाे शाळा शिक्षकाविना वाऱ्यावर; ९० टक्के शिक्षक मराठा आरक्षण सर्वेक्षणात
By निशांत वानखेडे | Published: January 22, 2024 06:24 PM2024-01-22T18:24:53+5:302024-01-22T18:25:04+5:30
३१ जानेवारीपर्यंत करायचे आहे सर्वेक्षण
नागपूर : मराठा आंदाेलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू केले आहे. या कामासाठी जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काही शाळात केवळ मुख्याध्यापक हजर असतील, बहुतेक शाळात शिक्षकच राहणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून पुढचे आठ दिवस जिल्ह्यातील बहुतेक शाळा वाऱ्यावर राहतील.
एकिकडे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याची हमी दिली जाते तर दुसरीकडे शिक्षकांना मूळ काम साेडून भलत्या कामात गुंतवले जात असल्याची टीका या पार्श्वभूमीवर हाेत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम मागासवर्गीय आयाेगाच्या माध्यमातून हाती घेतले आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात २३ ते ३१ जानेवारीदरम्यान सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. शिक्षकांना प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शहर क्षेत्रात महापालिका आयुक्त, तर नगरपरिषदेत मुख्याधिकारी, नगर पंचायत क्षेत्रात प्रशासकांच्या देखरेखीत कार्य हाेत आहे. नागपूर ग्रामीण क्षेत्रात जिल्हा परिषद, अनुदानित, विना अनुदानित शाळांचे जवळपास १२०० शिक्षक या कामात जुंपण्यात आले आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातही अशाप्रकारे १००-१२०० शिक्षक सर्वेक्षणात लागणार आहेत. १५ ते १८ शिक्षकांवर एक पर्यवेक्षक लक्ष ठेवेल. यात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. प्रगणक घराेघरी जावून सर्वेक्षण करणार असून ३१ नंतर हा डाटा आयाेगाकडे सादर केला जाईल.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
अध्यापनाचे काम करू द्या, अशी ओरड हाेत असताना दरवेळी शिक्षकांना या ना त्या कामात गुंतवले जाते. यावेळीही ९० टक्के शिक्षकांना कामावर लावण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक शाळा शिक्षकाविना बंद राहतील किंवा काही शाळांत केवळ मुख्याध्यापक उपस्थित राहतील. ग्रामीणमध्ये झेडपी शाळा अंबाझरी, खडगावची साईबाबा शाळा, महात्मा फुले शाळा केवळ मुख्याध्यापकाच्या भरवशावर असेल. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर त्याचे परिणाम हाेतील, अशी टीका केली जात आहे.
स्पर्धेसाठी मुलांना काेण नेणार?
सध्या तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयाेजन हाेत आहे. २३ व २४ जानेवारीला ते साेनेगाव बाेरी येथे आयाेजित करण्यात आले आहे. मात्र शाळांचे शिक्षकच नसल्याने मुलांना स्पर्धा स्थळी काेण घेऊन जाणार, हा प्रश्न आहे. एकतर विद्यार्थी जावू शकणार नाही किंवा स्पर्धाच रद्द कराव्या लागतील.
असे हाेईल सर्वेक्षण
एक शिक्षक किमान १०० ते १२५ घरी जाईल व जातीसह माहिती विचारण्यात येईल. ही माहिती माेबाईल अॅपवर भरण्यात येईल. हे अॅप २३ जानेवारीपासून सक्रिय करण्यात येईल. मराठा कुणबी असा उल्लेख सांगितल्यास पुढचे १२५ ते १५० प्रश्नांची माहिती भरायची आहे. हा संपूर्ण डाटा आयाेगाच्या वेबसाईटवर अपलाेड केला जाईल.
नवीन माेबाईल घ्या, पण करा
सर्वेक्षणाच्या कामात बचत गटाच्या महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. अनेकांकडे अॅन्ड्राईड माेबाईल नसल्याने सर्वेक्षणाचा अॅप डाउनलाेड हाेत नाही. काही शिक्षकांनाही ही अडचण आहे. मात्र अॅपसाठी नवीन माेबाईल घ्या, पण सर्वेक्षण करा, असे आदेश आहेत.