थेट गुगुलडाेहच्या जंगलातच पाेहचले शेकडाे विद्यार्थी
By निशांत वानखेडे | Published: July 9, 2023 03:04 PM2023-07-09T15:04:41+5:302023-07-09T15:05:42+5:30
मॅगनीज खाणीला कडाडून विराेध, ग्रामस्थांचीही साथ : जंगल वाचविण्यासाठी पाऊल
नागपूर/रामटेक :रामटेक जवळच्या भंडारबाेडी येथील शेकडाे विद्यार्थी अचानक मानेगाव-गुगुलडाेहच्या जंगलात पाेहचले. विद्यार्थ्यांना पाहून ग्रामस्थांनाही आश्चर्य वाटले. मात्र या मुलांकडून कारण ऐकल्यावर गावकऱ्यांनाही धक्का बसला. येथे प्रस्तावित मॅगनीज खाणीसाठी दाेन लाख झाडे कापली जाणार असून त्यात हे जंगलच नष्ट हाेणार आहे. त्याचा विराेध करण्यासाठीच विद्यार्थी जंगलात पाेहचले हाेते. मुलांनी घेतलेल्या पुढाकारात ग्रामस्थही त्यानंतर सहभागी झाली.
रामटेकजवळ गुगुलडाेहच्या १०५ हेक्टर परिसरात मॅगनीज खाण प्रस्तावित आहे. यातील ९९ हेक्टर जंगलाचा भाग आहे. हा भाग पेंच ते नेवगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा काॅरिडाॅर असून वाघांसह विविध प्राणी-पक्ष्यांचा त्यात अधिवास आहे. औषधी वनस्पतींसह विविध प्रजातींचे लाखाे वृक्ष आहेत. असे असताना वनविभाग आणि राज्य शासनाकडूनही या मॅगनीज खाणीला मंजुरी मिळाल्याचे आश्चर्य पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त हाेत आहे. याविराेधात न्यायालयात जाण्याची तयारी पर्यावरणप्रेमींनी चालविली आहे.
अशात शाळकरी विद्यार्थीही खाण प्रकल्पाविराेधात पुढे सरसावले आहेत. भंडारबाेरीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे विद्यार्थी याविराेधात जंगलात पाेहचले. रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती गज्जू यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गावकरीही या प्रकल्पाविराेधात विद्यार्थ्यांसाेबत उभे ठाकले आहेत. दाेन लक्ष झाडे कापल्याने खिंडसी जलाशय व तीन जलकुंभावर याचा विपरित परिणाम हाेणार आहे. शेतीच्या जलस्राेतांवर परिणाम हाेणार असून पेंच क्षेत्रातील लाेकांचा राेजगार संपुष्टात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या आंदाेलनात शिवनी-भोंडकीचे सरपंच विजय भूरे, किरनापुर (चोखाला) चे सरपंच कृष्णा उइके, कृषि उत्पन्न बाजार समिति, रामटेकचे संचालक रणवीर यादव उपस्थित हाेते. याशिवाय सचिन खागर, चंद्रकांत नंदनवार, गोपी सोनवाने, देवा वाडीभस्मे, सुशील रहाटे, अमर तरारे, महादेव मेश्राम, चिंधू वजाले, भंडारबाेडीचे माजी सरपंच महेंद्र दिवटे, दिनेश परतेती, बारसु कुंभरे, नितेश मरसकोल्हे, मोरेश्वर कुंभरे, सिकंदर कोकोडे, विक्की तांडेकर, श्रावण खंडाते, आकाश परतेती, लक्ष्मण शिवरकर, हिमांशु तरारे, सुरेंद्र वरकडे, दर्शन वक्कलकार, विजय सहारे, जगदीश ठाकरे, विनायक बरडे, माणिक बरडे, शालिक धुर्वे, संजय सहारे, बंटी धुर्वे, सचिन बेंद्रे, आदेश बुराडे, नंदू तरारे, पुरुषोत्तम दरवई, आकाश डोनारकर आदी उपस्थित हाेते.
एमपीसीबीतर्फे आज जनसुनावणी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल (एमपीसीबी) ने सोमवार १० जुलैला या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी बाेलावली आहे. नागरिकांनी माेठ्या संख्येने यात सहभाग हाेण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.