नागपूर जिल्ह्यात शेकडो गावांना पुराचा धोका; नवेगाव खैरी, नांद वडगाव धरणाचे दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 09:48 PM2022-07-13T21:48:29+5:302022-07-13T21:49:01+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहाम-मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच लहाम-मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या तब्बल ३४८ गावांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी पेंच नदीवरील नवेगाव खैरी हे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाचे पूर्ण १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचबरोबर उमरेड तालुक्यातील नांद-वडगाव धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले. यासोबतच दारे नसलेली एकूण १४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. चार धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. एकूण लहान-मोठ्या १८ धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यांतील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. रामटेक तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला होता. रामटेक तालुक्यातील रामटेक-मौदा बायपासची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली होती.
शहरातील कळमना व नारा भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. जवळपास ५० घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील काही शाळांनी बुधवारी स्वत:हून सुटी जाहीर केली होती. नागपुरात दोन दिवस पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.