अबब! नागपुरात सापडला काेट्यवधी वर्षांपूर्वीचा ‘एलिगेटर’ मासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:56 PM2023-04-12T13:56:12+5:302023-04-12T13:56:30+5:30
मासेमाराने गाेरेवाड्यात पकडले : पेंच कॅनालमार्गे आला असण्याचा अंदाज
नागपूर : १० काेटी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील अवशेषांची ओळख दर्शविणारा दुर्मीळ असा ‘एलिगेटर गार’ म्हणजे मगर मासा मंगळवारी नागपूरच्या गाेरेवाडा तलावात सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा मासा अतिशय दुर्मीळ मानला जात असून, ‘जिवंत जीवाश्म’ म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.
गाेरेवाडा तलावात मासेमारी करणारे किशाेर चाचेरकर यांच्या गळाला हा मासा लागला. दीड फूट लांब आणि जवळपास साडे तीन किलाे वजनाचा हा मासा दिसायला भयंकर वाटत हाेता. त्याचे ताेंड मगरीसारखे हाेते आणि दात अतिशय तीक्ष्ण हाेते. पाठीमागचा भाग टणक आणि डाेळे भीतीदायक वाटत असल्याचे किशाेर यांनी सांगितले. नेहमीच्या माशांपेक्षा वेगळा आणि दुर्मीळ वाटत असल्याने त्यांनी पुन्हा त्याला तलावात साेडून दिले.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा मासा मूळ उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यात वावरतो. ताेंड मगरीसारखे असल्याने त्याला ‘एलिगेटर’ असे संबाेधले जाते. माशांच्या आढळून आलेल्या जीवाश्मानुसार हा एकमात्र मासा शंभर वर्षांहून अधिक काळ आपले अस्तित्व टिकवून आहे. तो पाण्यात आणि पाण्याच्या बाहेरही श्वास घेऊ शकतो. त्याचे आतडे स्पायरल असल्याने पचनसंस्था शार्क माशासारखी आहे.
हा मासा जलचर प्राण्यांसाठी अत्यंत घातकच मानला जाताे. कारण ताे इतर माशांसह पानकोंबड्यासुद्धा खाऊ शकतो. पेंचच्या कॅनालमार्गे ताे गोरेवाडा तलावात आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किंवा मत्स संग्रहकर्त्याने निरुपयाेगी समजून ताे तलावात फेकला असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.