नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या परिसरातील शेकडो मोर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:01 AM2017-12-14T10:01:15+5:302017-12-14T10:03:55+5:30
अंबाझरी संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांमुळे शेकडो मोरांचे जीवन धोक्यात आले असून येथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अंबाझरी संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांमुळे शेकडो मोरांचे जीवन धोक्यात आले असून येथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ज्येष्ठ पक्षी निरीक्षकांनी अलीकडेच अंबाझरी संरक्षित वनक्षेत्रास भेट दिली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले.
अंबाझरीचा परिसर हा एकेकाळी देशीविदेशी पक्ष्यांचे नंदनवन मानला जात होता. स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्ष्यांचीही येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. विशेष म्हणजे नागपुरात पक्ष्यांच्या विविध ३१५ प्रजाती आढळतात. त्यापैकी २६५ प्रजाती या एकट्या अंबाझरी वनक्षेत्रात आहेत. परंतु बिघडत्या परिस्थितीत येथील पक्ष्यांच्या अनेक प्रजाती दिसेनाशा झाल्या आहेत. या क्षेत्रात जवळपास दोन हजार मोरांचा अधिवास होता. तो देखील येथील विकास कामांनी हिरावून घेतला आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार या वनक्षेत्रात पाणलोट विकास प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले होते. परंतु प्रत्यक्षात पाणलोट विकासाच्या नावावर जैवविविधता पार्कचा घाट घालण्यात आला.वनउद्यान व पाणलोट क्षेत्राच्या विकास कामावर देखरेख ठेवण्याचे कारण पुढे करीत एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने गेल्या पंधरवड्यात जेसीबी लावून जंगल संपविण्याचा उद्योग चालविला आहे. जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक आदी कामांना प्राधान्य दिले जात असून येथील मोरनाची (मोरांचा अधिवास) पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. परिणामी येथे वास्तव्याला असलेले मोर सैरभैर झाले आहेत. येथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या शिकारीचा धोका प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपासून अंबाझरी समोरचा परिसर आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात अनेक मोर जखमी अवस्थेत आढळून येत असल्याची माहिती आहे. मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराची शिकार करणाºया व्यक्तीस जेलची हवा खावी लागते. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर गायब झाल्यावर कुठला गुन्हा दाखल करणार, असा या पक्षिप्रेमींचा सवाल आहे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही या जंगलाच्या संवर्धनासाठी धडपडतो आहे. येथील जैवविविधता जपण्याचे प्रयत्न करीत आहोत. परिणामी येथील मोरांची संख्या हजारावर गेली. आणि आता मात्र या जैवविविधतेवर जेसीबी चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे आम्ही सहन करणार नाही,असा इशारा पक्षिप्रेमींनी दिला आहे.
समितीवर आक्षेप
पक्षिप्रेमींनी या समितीवरच आक्षेप घेतला असून वनांव्यतिरिक्त इतर कुठलेही काम करायचे नसताना या समितीची गरजच काय, असा त्यांचा सवाल आहे. काही लोक मुख्यमंत्र्यांच्या नावावर लोकांची दिशाभूल करुन चुकीच्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
आज वनसचिवांना भेटणार
पक्षिप्रेमींचे एक शिष्टमंडळ आज १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पक्षितज्ञ गोपाळ ठोसर, डॉ. अनिल पिंपळापुरे, कुंदन हाते, विनीत अरोरा, नितीन मराठे, अविनाश लोंढे यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
मारुती चितमपल्ली बर्ड पार्क
अंबाझरी वनक्षेत्र हे आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्टतील विविध जंगलांमध्ये वास्तव्य करणारे, आपले उभे आयुष्य पक्ष्यांसाठी खर्ची घालणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावाने ओळखले जावे, अशी मागणी वन्यजीव व पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तसा प्रस्तावही त्यांनी वनमंत्र्यांकडे पाठविला आहे.