शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेत दाखविले अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:37+5:302021-09-02T04:16:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागत असून, अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागत असून, अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतरदेखील शेकडो विद्यार्थ्यांना निकालांमध्ये अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, नागपूर विद्यापीठाने यासंदर्भात चौकशी समिती गठित केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
नागपूर विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करू नये, यासाठी विविध सूचना अगोदरच देण्यात आल्या होत्या. मोबाईल किंवा संगणकावरून परीक्षा देत असताना इतर कुठलेही संकेतस्थळ उघडू नये, अशी स्पष्ट अट होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी या अटीचे पालन केले नाही. सॉफ्टवेअरनुसार अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुपस्थित दाखविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. सदस्यांनी विद्यार्थ्यांची बाजू आक्रमकपणे मांडत कुलगुरूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणात समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी विष्णू चांगदे यांनी केली. अखेर या मुद्यावर चौकशी समिती गठित करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
विलंब शुल्क घेऊ नये
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुपस्थित दाखविण्यात आले आहे, त्यांना परत परीक्षा देणे अनिवार्य आहे. त्यांच्याकडून परीक्षेसाठी विलंब शुल्क घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता हे विलंब शुल्क घेऊ नये, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.