रुग्णांची उपासमार थांबणार!
By Admin | Published: March 5, 2016 03:06 AM2016-03-05T03:06:20+5:302016-03-05T03:06:20+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहात तोकड्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना अर्धपोटी रहावे लागते होते.
मेडिकल : पोळी तयार करण्याचे घेतले यंत्र
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहात तोकड्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना अर्धपोटी रहावे लागते होते. नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आणि तोही निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तब्बल दोन महिन्यानंतर याची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. शासन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवित नसल्याचे पाहत पोळ्या बनविणारे ‘रोटीमेकर’च विकत घेतले. ३ लाख ५० हजार रुपयांच्या या मशीनमधून एका तासांत ८०० पोळ्या बाहेर पडतात.
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्य रुग्णांना औषधोपचारांसह पौष्टिक आहार मिळावा यासाठी रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच पाकगृह सुरू आहे. मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्तासह दोन वेळेचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. परंतु येथे सर्वच नियमाना हरताळ फासला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१५ च्या अंकात ‘मेडिकलमध्ये रुग्णांची उपासमार’ प्रसिद्ध केले होते.(प्रतिनिधी)
मुख्य सचिवांच्या निर्देशालाही बगल
हिवाळी अधिवेशन काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, या विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे हे सर्वच शहरात उपस्थित असतानाही मेडिकलच्या रुग्णांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचे वास्तव मांडले. याची दखल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतली. त्यांनी त्या काळात मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी करताना रुग्णाच्या आहाराकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. रुग्णांच्या आहाराची काळजी घ्या, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र पुढे या निर्देशाचे पालनच झाले नाही.
संचालकांचे आश्वासनही गुलदस्त्यात
याच वृत्ताला घेऊन ‘लोकमत’शी बोलताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले, मेडिकलच्या पाकगृहासंदर्भात शासन गंभीर आहे. ५० पदे मंजूर असताना केवळ १९ कर्मचाऱ्यांवर ८०० रुग्णांचा भार आहे. स्वयंपाकीची पदे लवकरात लवकर भरण्यात येईल, या शिवाय प्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन खर्चात २५ रुपयांची वाढ करण्यावरही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन संपून दोन महिन्याचा कालावधी होऊनही कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असली तरच रुग्णांना दोन पोळ्या मिळत होत्या. अन्यथा एका पोळीवर तर अनेकवेळा पोळीविनाच आहारावर समाधान मानावे लागत होते.
कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येवर ‘रोटीमेकर’ तोडगा
अखेर मेडिकल प्रशासनाने यावर प्रभावी तोडगा म्हणून पोळ्या बनविणारी मशीनच घेण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे शुक्रवारी मेडिकलमध्ये एक अत्याधुनिक ‘रोटीमेकर’ आले आहे. कणकीचा गोळा बनवून त्यात टाकल्यास पोळ्या तयार होऊन आपोआप बाहेर पडतात. पूर्वी पोळ्या बनविण्यासाठी दहा कर्मचारी लागायचे. आता ‘रोटीमेकर’ चालविण्यासाठी दोन किंवा तीन कर्मचारीच लागणार आहेत. शनिवारी या ‘रोटीमेकर’चे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.