अजनीवन वाचविण्यासाठी वृक्षप्रेमी तरुणांचे उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 11:42 PM2021-06-04T23:42:15+5:302021-06-04T23:42:55+5:30
Ajniwan , Hunger strike अजनीवन परिसरातील प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी हाेणाऱ्या ४५०० च्यावर झाडे ताेडण्याच्या निर्णयाविराेधात शुक्रवारी वृक्षप्रेमी तरुणांनी साखळी उपाेषण सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीवन परिसरातील प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी हाेणाऱ्या ४५०० च्यावर झाडे ताेडण्याच्या निर्णयाविराेधात शुक्रवारी वृक्षप्रेमी तरुणांनी साखळी उपाेषण सुरू केले. मात्र, काेराेना नियंत्रण नियमांचे कारण देत पाेलिसांनी तरुणांचे आंदाेलन माेडून काढले.
एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ४५२२ तर चार टप्प्यातील ४९० एकरमधील कामासाठी ४० हजारांच्या वर झाडे ताेडली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यातील वृक्षताेडीबाबत जाहिरातही प्रकाशित केली आहे. मात्र, माेठ्या प्रमाणात हाेणाऱ्या या वृक्षताेडीच्या प्रकाराचा समाजातील सर्व स्तरातून विराेध केला जात आहे. काही वैयक्तिक तर काही संस्थांच्या माध्यमातून असंताेष व्यक्त केला जात आहे. अनेक संस्थांकडून स्वाक्षरी अभियान राबवून त्या तक्रारी मनपाकडे नाेंदविण्यात आल्या. या शृंखलेत शुक्रवारी रेल्वे मेन्स हायस्कूल माजी विद्यार्थी कृती समितीच्या तरुण पर्यावरणप्रेमींनी रेल्वे मेन्स शाळेच्या आवारात साखळी उपाेषण सुरू केले. सुरुवातीला आंदाेलकांच्या संख्येवरून पाेलिसांनी विराेध दर्शविला. त्यानंतर पाच लाेकांना परवानगी देण्यात आली. जाेसेफ जाॅर्ज, अनिकेत कुत्तरमारे, रंजित यादव, अमोल नरुले, ऋषिकेश बहाकर, दुर्गेश जंजाळकर, प्रवीण मोरे, विशाल देवकर, शुभम मेश्राम, पीयूष डोईफोडे आदी या आंदाेलनात सहभागी झाले हाेते. दुपारी पाेलिसांनी बळाचा वापर करून आंदाेलन माेडून काढले. मात्र, हा लढा संपलेला नाही, असे अनिकेतने जाहीर केले.