‘हंजर’चा कोट्यवधीचा घोटाळा; चौकशीसाठी नागपूर मनपा विधी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:55 PM2019-11-30T22:55:20+5:302019-11-30T22:56:09+5:30
नागपूर शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ कंपनीने कामात दिरंगाई करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ कंपनीने कामात दिरंगाई करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. यात मनपाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
हंजरच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचा प्रश्न अनेकदा सभागृहात आला होता. सभागृहाने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव विधी समितीकडे पाठविला होता. त्यानुसार समिती चौकशी करणार आहे. या समितीत धर्मपाल मेश्राम यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, जयश्री वाडीभस्मे आदींचा समावेश आहे.
बैठकीला उपसभापती अॅड. मीनाक्षी तेलगोटे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, शकुंतला पारवे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे, विजय हुमने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.
कचरा कंत्राटाचा अहवाल सादर करा
कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या बी.व्ही.जी. आणि ए.जी. एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांनी निविदेची कायदेशीर परिपूर्तता केली आहे का,याबाबतचा आढावा घेण्यात आला. कार्यादेश देण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे का, कचरा संकलनाबाबत प्रशासन समाधानी आहे काय, कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि कार्यपद्धती यासंदर्भात नेमकी मनपाची भूमिका, कामात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने निविदेमधील अटी व शर्तींचा अभ्यास करून अहवाल समितीपुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
‘आशा’च्या रिक्त जागा भरा
नागपूर शहरात असलेल्या आशा वर्कर, त्यांची नियुक्ती आदीसंदर्भात समितीने माहिती जाणून घेतली. ५२२ आशा ची पदे मंजूर असून सध्या ४९८ आशा कार्यरत आहेत. उर्वरित २४ जागा तातडीने भरण्याचे निर्देश देतानाच ही संख्या पुरेशी आहे काय, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी २ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे निर्देशही सभापतींनी आरोग्य विभागाला दिले.