पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाईचा हंटर; नियमभंग केल्यास होणार कठोर दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 10:06 PM2023-04-03T22:06:27+5:302023-04-03T22:10:27+5:30

Nagpur News नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या पब-हुक्का पार्लरवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Hunter of action on pubs, hookah parlors; Strict action will be taken if the rule is violated | पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाईचा हंटर; नियमभंग केल्यास होणार कठोर दंड

पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाईचा हंटर; नियमभंग केल्यास होणार कठोर दंड

googlenewsNext

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील पब्जमधील गैरप्रकारांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तेथील गैरप्रकारांबाबत मवाळ धोरण घेणाऱ्या पोलिस प्रशासनाला अखेर जाग आली आहे. नियमभंग करणारे पब व हुक्का पार्लरविरोधात आता कारवाईचा हंटर उगारण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या पब-हुक्का पार्लरवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या इल्युजन पबला महिनाभरासाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पब चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर येथील ब्लू लीफ इल्युजन बार पबमध्ये शुक्रवारी रात्री सहायक पोलिस आयुक्त नीलेश पालवे आणि एका हवालदाराला मारहाण करण्यात आली होती. तेथे सुरू असलेल्या पार्टीत अल्पवयीन मुलांनाही दारू दिली जात होती. पोलिसांनी पालवे आणि हवालदाराला मारहाण करणाऱ्या तरुणांसह पब चालक गौरांग शिक्षार्थीविरोधात दारूबंदी कायदा आणि अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पबमध्ये क्षमतेपेक्षा खूप जास्त लोक आले होते व त्यात अल्पवयीन मुलांची संख्या सर्वाधिक होती. नशेत तरुण-तरुणी रात्री दोन वाजेपर्यंत पार्टी करत होते. पबमध्ये आग किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडली तर ते टाळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. छाप्याची माहिती मिळताच मद्यधुंद तरुण-तरुणींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. असाच प्रकार अलंकार टॉकीज चौकातील ड्रिंक्समध्येही घडला. तेथेही गर्दीमुळे प्रवेश न मिळाल्याने संतप्त तरुणांनी गोंधळ घातला होता. याप्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेतली असून, पब आणि हुक्का पार्लरची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या पब आणि हुक्का पार्लरवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस पब आणि हुक्का पार्लरविरोधात विशेष मोहीम राबवणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दारू प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांना पब व बारवर कठोर कारवाईचा अधिकार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि हुक्का पार्लरवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष

शहरातील पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल्स हे विविध घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील काही पबमधील घटना, हुक्का पार्लर्सची वाढती संख्या व हॉटेल्समधील नियमभंग यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोनेगाव येथील हॉटेल डाबो क्लबमध्ये महिला ग्राहक व त्यांच्या कुटुंबीयांना गुन्हेगारांनी बेदम मारहाण, १८ मार्च रोजी सिव्हिल लाइन्सच्या ९० एम. एल. पबमध्ये नाचत असताना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून ग्राहकावरील चाकूहल्ला, डाबो क्लबसमोरच मद्यधुंद तरुणीकडून प्रवेशासाठी कपडे उतरविण्याचा प्रयत्न, त्याच क्लबमधील बाउन्सर्सकडून मारहाण हे प्रकार चर्चेत राहिले. पोलिस आयुक्तांनी ठाणेदारांना यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीदेखील शहरात या घटना घडल्या. त्यामुळे पोलिस आयुक्तांचा ठाणेदारांना धाक राहिला नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विनापरवानगी डीजे अन् उशिरापर्यंत पार्टी

अनेक पब, हुक्का पार्लर, लाउंज आणि हॉटेल्सच्या बंद दारांआड रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असते. अनेक पार्ट्यांमध्ये दारूसोबत एमडी, गांजा किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन केले जाते. डीजेसाठीही कोणाचीही परवानगी घेतली जात नाही. पोलिस यंत्रणेला याची माहिती असतानादेखील ठोस कारवाई होत नव्हती व त्यामुळेच पब चालकांची हिंमत वाढली.

Web Title: Hunter of action on pubs, hookah parlors; Strict action will be taken if the rule is violated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.