नागपुरातील बेदरकार स्कूल व्हॅन-ऑटोचालकांवर चालणार हंटर
By योगेश पांडे | Published: August 25, 2024 06:45 PM2024-08-25T18:45:59+5:302024-08-25T18:46:12+5:30
गुन्हा दाखल करत परवाना निलंबित करणार
नागपूर: शहरात बरेच ऑटोचालक व व्हॅनचालक नियमांचे उल्लंघन करत शालेय विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालताना दिसून येतात. अशा चालकांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले असून त्यांचा वाहन परवानादेखील निलंबित करण्यात येईल. यासंदर्भातील एक कारवाई झालीदेखील असून एका ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमएच ४९ एआर १९०१ या क्रमांकाच्या ऑटोचालकाने शालेय विद्यार्थी आत असताना धोकादायक पद्धतीने वाहन चालविले होते. रॉंगसाईड ऑटो चालवत त्याने मुलांच्या जीवाला धोका निर्माण केला होता. यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनादेखील माहिती कळाली. त्यांनी संबंधित ऑटोविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या. वाहतूक शाखेने प्रवीण श्यामराव घिवडोंडे (४०, गवळीपुरा, गिट्टीखदान) या ऑटोचालकाचा शोध घेतला व त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. त्याचा वाहतूक परवाना निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यापुढे वाहतूक शाखेकडून दररोज अशा ऑटोचालकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
- यामुळे होणार ऑटोचालकांविरोधात कारवाई
मागील काही काळामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटो, व्हॅन व ब चालक यांच्या चुकींमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळेच कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या वाहनचालकांनी वाहन राॅगसाईडने, वेगाने, बेदरकारपणे चालवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालकांनीदेखील वाहनचालकांना याबाबत योग्य सूचना द्यावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.