बंटी-बबलीचा शेकडो बेरोजगारांना गंडा
By Admin | Published: November 29, 2014 02:53 AM2014-11-29T02:53:08+5:302014-11-29T02:53:08+5:30
नोकरीचे आमिष दाखवून रुचिका आणि आदित्य नामक एका जोडीने शेकडो बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला.
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून रुचिका आणि आदित्य नामक एका जोडीने शेकडो बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला. नोकरीच्या आशेपोटी या बंटी-बबलीच्या जोडीकडे रक्कम देणाऱ्यात नागपूरच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यातील बेरोजगारांचा समावेश आहे.
रुचिका आणि आदित्य नेमके कुठे राहतात, त्याची पोलिसांकडे माहिती नाही. ते परप्रांतातील रहिवासी आहे, एवढेच फसगत झालेले सांगतात.
महागडे कपडे आणि मोबाईल घेऊन रुबाबात आलिशान कारमधून फिरायचे. एखाद्या बेरोजगाराला प्रारंभी जाळ्यात ओढायचे. त्याला नोकरीचे आमिष दाखवायचे. त्याच्या माध्यमातून त्याच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क करायचा आणि नंतर त्यांनाही नोकरीचे आमिष दाखवायचे, अशी या जोडीची पध्दत आहे. त्यांनी नागपूर विदर्भातील शेकडो बेरोजगारांना अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले आहे. वर्धा येथील स्वागत कॉलनीत (कारला रोड) राहणारा पराग क्रिष्णराव मिसाळ तसेच अन्य १३ जणांना अभियंता म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष रुचिका आणि आदित्यने दाखविले. त्यांच्याकडून सप्टेंबर २०१४ मध्ये प्रत्येकी १० हजार रुपये घेतले. एमआयडीसीतील राजीवनगरात (जाधव कॉम्प्लेक्स) हा व्यवहार झाल्यानंतर हे दोघे पसार झाले. प्रारंभी फोनवरून ते पीडित तरुणांना नियुक्तीची तारीख सांगत होते. आता त्यांनी आपले फोनच बंद करून ठेवले आहेत. त्यांनी फसगत केल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित १४ तरुण गुरुवारी एमआयडीसी ठाण्यात पोहचले. त्यांच्यापैकी पराग मिसाळच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुचिका आणि आदित्य सिंगविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)