शिकार, दारूच्या पलिकडे जाऊन भटका समाज शोधतोय अस्तित्त्वाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:40+5:302021-06-26T04:07:40+5:30

- बबन गोरामन : धर्मांतरणाच्या इशाऱ्याने राजकीय नेत्यांना आणले वठणीवर प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजपासून ...

Hunting, going beyond alcohol, wandering society looking for existence | शिकार, दारूच्या पलिकडे जाऊन भटका समाज शोधतोय अस्तित्त्वाची वाट

शिकार, दारूच्या पलिकडे जाऊन भटका समाज शोधतोय अस्तित्त्वाची वाट

Next

- बबन गोरामन : धर्मांतरणाच्या इशाऱ्याने राजकीय नेत्यांना आणले वठणीवर

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आजपासून ६० वर्षापूर्वी जंगलात राहून शिकार करणे, दारू काढून उदरनिर्वाह करणे ही पारधी, फासे पारधी समाजाची दैनंदिनी होती तर काही ठिकाणी लुटारू जमात म्हणून ते बदनाम होते. त्यांच्या वाताहतीला इंग्रज व तत्कालिन स्थितीची ही देण होती. मात्र, स्वातंत्र्यानंतरही बदनामीने साथ सोडली नाही. मात्र, समाजातील बबन गोरामन यांच्यासारख्या जाणत्यांच्या प्रयत्नाने परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे.

वर्षाचे आठ महिने शिकार, भिक मागण्यासाठी जंगल व गावोगावी भटकंती करणे आणि पावसाळ्याची चार महिने मिळेत तिथे बेडा ठोकून राहणे. या काळात दारू काढणे, हा त्यांचा व्यवसाय. हिंगणा येथील डेग्मा खुर्द येथे हा समाज अशा तऱ्हेने भटकंती करत असताना १९५०-५५च्या सुमारास गावातील नत्थू खाडे पाटील यांना त्यांची ही दयना बघवेना. म्हणून त्यांनी ठेक्याने शेती देऊ केली. ताराचंद विठोबा पवार या फासे पारध्याने सर्वप्रथम ठेका घेतला आणि पुढे हळूहळू काहींनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शेती करण्यास सुरुवात केली आणि आत्ताच्या शेषनगरात हा बेडा १९६२ मध्ये स्थायी झाला. नंतर बॅ. शेषराव वानखेडे यांनीच या बेड्याचे नाव शेषनगर असे केले. मात्र, ना जमीन, ना जात प्रमाणपत्र, ना रेशनकार्ड. देशाच्या लेखी अस्तित्त्वच नव्हते. म्हणून हिंदू धर्माला आपल्या अस्तित्त्वाची जाणिव करवून देण्यासाठी १९९४-९५ मध्ये धर्मांतरणाचा खोटा इशारा देण्याची युक्ती बबन गोरामन या युवकाच्या डोक्यात शिरली. त्याची आग आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. मिशनरी संघटना, मुस्लिम संघटना यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, देवीभक्त असलेला हा समाज मुळाशी दगा करणार नाही, असे ठणकाऊन सांगत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शेषनगरात दाखल झाले. पक्की घरे, प्रत्येकाला शेतजमीन, रेशन कार्ड व जातप्रमाणपत्राची योजना जाहीर झाली आणि समाजाला खऱ्या अर्थाने अस्तित्त्व लाभले. सोबतच शाळांची पायाभरणी झाली आणि आज हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात उतरला आहे.

----------

८० टक्के गाव झालाय दारूमुक्त

पूर्वी शेषनगर बेडा संध्याकाळच्या सुमारास ओलांडू शकत नव्हता, इतकी दहशत होती. त्यामुळे, इतर समाजाशी मेळ होत नव्हता. ही बाब बघून मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी काही राजकीय नेत्यांना पाठीशी धरून दारू व्यवसाय तोडण्यास सुरुवात केली. धर्मांतरणाला नकार दिल्यामुळे आधिच आमच्यावर जिवघेणे हल्ले सुरू झाले होते. त्यात दारू तोडण्याचे कारस्थान सुरू केल्याने आप्तांच्या द्वेषालाही बळी पडत होतो. मात्र, आत हा बेडा ८० ते ८५ टक्के दारूमुक्त झाल्याचे आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष बबन गोरामन यांनी सांगितले.

---------------

जात प्रमाणपत्राचा घोळ

आम्ही व्हीजेएनटी, एनटी की एसटी याची जाणच आम्हाला नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्यासाठी अनेक योजना सादर झाल्या. मात्र, जातप्रमाणपत्राअभावी त्यांचा काहीच लाभ होत नव्हता. तेव्हा योजना बाजूला सारा आधि आम्ही कोणत्या जातीचे, हे सांगा हे ठणकावून सांगितल्यावर आम्हाला जात प्रमाणपत्र मिळायला लागले व योजनाही पोहोचू लागल्या.

--------------

चार पोस्ट ग्रॅज्युटेट

माझे शिक्षण कसे झाले हा मोठा पेच आहे. मात्र, आज माझ्या घरात चार पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. शेषनगरात १५ मुले ग्रॅज्युएट झाले. काही १२वी तर काही दहावी पर्यंत पोहोचले. शिक्षणाची महती आता पटायला लागली आहे. यात बँकेत मॅनेजर असलेले मंगल भोसले याच गावचे होत आणि ते शेषनगरातून पहिले १२वी पास झालेले व्यक्ती होत. त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. हा समाज गुन्हेगारमुक्त, दारिद्र्यमुक्त, भिक्षामुक्त, व्यसनमुक्त करण्याचा माझा संकल्प पूर्ण होत असल्याचा आज आनंद वाटतो, असे ते म्हणाले.

......................

Web Title: Hunting, going beyond alcohol, wandering society looking for existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.