नातेवाईकांसह नवऱ्यालाही गंडविले
By admin | Published: February 8, 2016 03:20 AM2016-02-08T03:20:23+5:302016-02-08T03:20:23+5:30
पुणे-मुंबईतील अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील एका महिलेने नातेवाईकांसह चक्क स्वत:च्या पतीलाही गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
८७ लाखांचा गंडा : पुण्यातील महिलेचा प्रताप
नागपूर : पुणे-मुंबईतील अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील एका महिलेने नातेवाईकांसह चक्क स्वत:च्या पतीलाही गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. अनघा कार्तिक बोरीकर (वय २९) असे या महिलेचे नाव असून, अंबाझरी पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ग्रीनलँड कौंटी, नवले कॉम्प्लेक्सजवळ, नरेगाव (पुणे) येथे राहणारी अनघा नागपुरातील व्यावसायिक कार्तिक रमेश बोरीकर (वय ३३) यांची पत्नी होय. ते अंबाझरी लेआऊट, नागपूर येथे राहतात. अनघाने २७ जानेवारी २०१६ पूर्वी बनावट दस्तऐवज तयार केले. त्यावर कार्तिक यांची बनावट स्वाक्षरी करून पतीच्या नातवाईकांच्या मोबाईल व्हॉट्स अॅपवर हे बनावट दस्तऐवज पाठविले.
त्याआधारे नऊ जणांना स्वस्तात कार मिळवून देण्याची आणि कार न दिल्यास घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याची तयारी दाखवून ८६ लाख ८४ हजार ६०९ रुपयांचा गंडा घातला. कुण्या कारणाने कार मिळाली नाही तर आपली रक्कम व्याजासह परत मिळणार आणि त्याची हमी कार्तिक बोरीकर हे घेत असल्याचा गैरसमज झाल्यामुळे नऊ जणांनी अनघाला रक्कम दिली. ती रक्कम हडपल्यानंतर अनघा टाळाटाळ करीत असल्याचे पाहून नातेवाईकांनी कार्तिक बोरीकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर तिची बनवाबनवी उघड झाली. पत्नीकडून फसवणुकीसोबतच आपली प्रतिमाही खराब केली जात असल्याचे लक्षात आल्यामुळे बोरीकर यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय एस. एस. सुरोशे यांनी याप्रकरणी अनघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
सिने अभिनेत्याचीही फसवणूक
अनघाने यापूर्वी अशाच प्रकारे अनेक व्यापारी, उद्योजक आणि एका सिने अभिनेत्याचीही फसवणूक केल्याची चर्चा आहे. तिच्याविरुद्ध पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल असल्याचे समजते.