नाेट घेतली असली, परत केली नकली; साडेचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:18 AM2021-12-02T11:18:19+5:302021-12-02T11:34:16+5:30
मलेवार यांनी प्लाॅटसाठी नातेवाइकांकडून ४.५० लाख रुपये गाेळा केले व पाटीलला याबाबत माहिती दिली. पाटीलने माेठी रक्कम घरी ठेवणे धाेकादायक असल्याची भीती दाखवीत हा पैसा त्याच्या पत्नीकडे ठेवण्यास सांगितले.
नागपूर : खऱ्या नाेटा घेऊन बनावट नाेटा परत करीत एका व्यक्तीची साडेचार लाखांची फसवणूक करण्याचे प्रकरण समाेर आले आहे. हुडकेश्वर पाेलिसांनी या प्रकरणात विनाेद बिसन पाटील व त्याची पत्नी विद्या पाटील यांच्याविराेधात गुन्हा दाखल करीत दाेघांनाही अटक केली आहे.
न्यू अमरनगर येथील रहिवासी संदीप मलेवार मूळचे तिराेडा येथील रहिवासी आहेत. ते येथे भाड्याने राहत असून, सलूनचा व्यवसाय करतात. त्यांना नागपुरात प्लाॅट घेण्याची इच्छा हाेती. आराेपी विनाेद पाटीलशी मलेवार यांची जुनी ओळख आहे. त्यांनी पाटील यांना बजेटमध्ये प्लाॅट पाहण्याची विनंती केली. यादरम्यान पाटीलने ७ ऑक्टाेबर राेजी मलेवार यांची कथित दलालांशी भेट करून दिली. दलालांनी त्यांना एक प्लाॅट दाखविला. मलेवार यांनी प्लाॅटसाठी ५.८५ लाख रुपयांत साैदा केला. त्यांनी नातेवाइकांकडून ४.५० लाख रुपये गाेळा केले व पाटीलला याबाबत माहिती दिली. पाटीलने माेठी रक्कम घरी ठेवणे धाेकादायक असल्याची भीती दाखवीत हा पैसा त्याच्या पत्नीकडे ठेवण्यास सांगितले. तिच्याकडे अनेकांचा पैसा राहत असल्याचेही सांगितले.
मलेवार यांनीही विश्वास ठेवत १२ ऑक्टाेबरला साडेचार लाख रुपये विनाेद पाटील व त्याच्या पत्नीकडे दिले. दरम्यान, १४ ऑक्टाेबरला फाेन करून ठेवलेले पैसे परत देण्यास सांगितले. पाटीलने पैसे घरी येऊन देणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ताे मलेवार यांच्या घरी पाेहोचला व काही न बाेलता आलमारीमधून बॅग काढून त्यात पैसे ठेवू लागला. मलेवार यांना नाेटा पाहिल्यावर त्या बनावट असल्याचा संशय आला. विचारणा केली असता पाटीलने हे पैसे दुसऱ्याने ठेवायला दिले असल्याचे सांगितले व पैशाची बॅग ठेवून तेथून निघून गेला. त्यानंतर मलेवार यांनी हुडकेश्वर पाेलिसांकडे तक्रार केली. साेमवारी सामाजिक कार्यकर्ते नूतन रेवतकर यांना घेऊन पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडेही तक्रार केली. पाेलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार हुडकेश्वर पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत आराेपींना ताब्यात घेतले.
प्राॅपर्टी डीलरचा सहभाग असल्याचा संशय
या प्रकरणात पाटील दाम्पत्यासह कथित प्राॅपर्टी डीलरचाही सहभाग असल्याचा संशय आहे. मलेवार यांच्याशी प्लाॅटचा साैदा करताना धनादेश स्वीकारण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे मलेवार यांना राेख रक्कम द्यावी लागली. त्यांच्या भाेळ्या स्वभावामुळे आराेपींनी त्यांची फसवणूक केली. या गुन्ह्यात वापरलेल्या नाेटा मनाेरंजनाच्या आहेत, ज्यांचा वापर लहान मुले खेळण्यासाठी करतात.