बेवफा औरत को काटके आया; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:30 AM2018-05-18T10:30:48+5:302018-05-18T10:31:00+5:30
रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री नागपूर अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. त्याच्या या वर्तनाने काही वेळेसाठी पोलिसही गोंधळले. मात्र, लगेच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही थरारक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. रामदिनेश मिश्रा (वय ४४) असे आरोपीचे तर मंजुला मिश्रा (वय ३७) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी मिश्रा हा आचारी असून, त्याला १५ वर्षांची गतिमंद मुलगी आहे. तो संजयनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ राहत होता. पत्नी मंजुलाचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. त्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्याने तिला सांभाळण्याचा अनेकदा इशाराही दिला होता. पत्नी असे काहीच नाही म्हणून सांगत होती. मात्र, आरोपीच्या डोक्यातील संशयाचा किडा काही केल्या स्वस्थ बसत नव्हता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास त्याला काय दिसले माहीत नाही, त्याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर चायनीज चॉपरने पत्नी मंजुलावर आठ ते दहा घाव घालून तिला घरातच रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ती मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर रक्ताने माखलेल्या कपड्याने तो सरळ अंबाझरी ठाण्यात पोहचला. त्याने ठाणेदार भीमराव खंदाळे यांचा कक्ष गाठून पत्नीला ठार मारून आल्याची माहिती दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचे नाव, पत्ता विचारला. त्यानंतर त्याचे घर गाठून पंचनामा करत मंजुलाचा मृतदेह मेडिकलला पाठविला.
परिसरात प्रचंड दहशत
या थरारक हत्याकांडाने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. पोलीस पोहचेपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, मिश्रा दाम्पत्याला असलेली १५ वर्षीय मुलगी गतिमंद आहे. तिला काय झाले हे पुरते कळले नसले तरी काही तरी भयावह झाले याची तिला जाणीव झाली होती. त्यामुळे त्या बिचारीची अवस्था सैरभैर झाली होती. पोलिसांनी तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आरोपी मिश्राला अटक करण्यात आली.