घरगुती वादातून चाकूने भाेसकून पत्नीचा खून, वाडी शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:17 PM2023-04-08T14:17:44+5:302023-04-08T14:20:50+5:30
आराेपी पतीला आर्वी येथून अटक
वाडी (नागपूर) : पती-पत्नीतील घरगुती वाद विकाेपास गेल्याने पतीने पत्नीचा चाकूने भाेसकून खून केला. ही घटना वाडी (ता. नागपूर ग्रामीण) शहरातील नवनीतनगरात गुरुवारी (दि. ६) रात्री घडली असून, शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली. आराेपी पतीस आर्वी (जिल्हा वर्धा) येथून ताब्यात घेत अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.
माधुरी मनोज सरोदे (४०) असे मृत पत्नीचे, तर मनोज ज्ञानेश्वर सरोदे (५०) अटक करण्यात आलेल्या आराेपी पतीचे नाव आहे. मनाेज मूळचा आर्वी येथील रहिवासी असून, ताे मागील सहा महिन्यांपासून वाडी शहरातील नवनीतनगरात बालपांडे यांच्या घरी किरायाने राहताे. ताे एमआयडीसी परिसरातील केबल कंपनीमध्ये तर माधुरी सिंपलेक्स कंपनीत कामगार म्हणून काम करायची. त्याला दारूचे व्यसन हाेते.
पती-पत्नीमध्ये पूर्वीपासून घरगुती कारणांवरून वाद हाेता. त्यांचा हा वाद नातेवाइकांनाही माहिती हाेता. त्यामुळे नातेवाइकांनी दाेघांनाही आर्वीला बाेलावले हाेते. दरम्यान, मुलगा शुक्रवारी सकाळी घरी आला असता, त्याला आई माधुरी रक्ताच्या थाराेळ्यात पडून असल्याचे दिसले. त्यामुळे ताे रडायला लागला. यावेळी मनाेज बेपत्ता हाेता. माधुरीच्या डाेके, पाेट व ताेंडावर चाकूने वार केल्याच्या जखमा असल्याने तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
हा प्रकार उघड हाेताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त अनुराग जैन, सहायक आयुक्त प्रवीण तिजाडे, पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला. माधुरीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. दुसरीकडे वाडी पाेलिसांच्या पथकाने आराेपी मनाेजला आर्वी शहरातून ताब्यात घेत वाडीला आणले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
मुलगी, मुलगा नातेवाइकांकडे
माधुरी व मनाेजला माेनिका (१८) आणि प्रेम (१२) अशी दाेन अपत्ये आहेत. माेनिका आर्वी येथे नातेवाइकांकडे, तर प्रेम त्याच्या मावशीकडे मुक्कामी हाेता. त्याची मावशीदेखील नवनीतनगरात राहते. त्यामुळे घटनेच्या रात्री (गुरुवारी) माधुरी व मनाेजव्यतिरिक्त घरी कुणीही नव्हते. त्या दाेघांमध्ये भांडण झाले आणि त्याच भांडणात मनाेजने चाकूने वार करून माधुरीची हत्या केली. त्यानंतर ताे वाडी शहरातून पळून गेला हाेता.