पत्नीच्या डोहाळेजेवण कार्यक्रमात पतीची भोसकून हत्या

By योगेश पांडे | Published: February 22, 2024 06:46 PM2024-02-22T18:46:16+5:302024-02-22T18:50:58+5:30

शुल्लक कारणावरून शेजारच्या बापबेट्याने भोसकले : इमामवाड्यातील जाटतरोडीत थरार

Husband stabbed to death at his wife's baby shower ceremony solapur crime news | पत्नीच्या डोहाळेजेवण कार्यक्रमात पतीची भोसकून हत्या

पत्नीच्या डोहाळेजेवण कार्यक्रमात पतीची भोसकून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेब्रुवारी महिना हा नागपुरसाठी हत्यांचा महिना ठरला आहे. बुधवारी रात्री शहरात आणखी एका हत्येची नोंद करण्यात आली. शुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपी बापबेट्याने रेल्वेतील एका कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतकाच्या पत्नीच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमातच त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

महेश विठ्ठल बावणे (२३, जाटतरोडी) असे मृतकाचे नाव आहे. तर शेरू उर्फ शंकर भोलासिंग राठोड (५२) व रितिक शंकर बावणे (२१) अशी आरोपींची नावे आहेत. ते महेशच्या शेजारीच राहत होते. बुधवारी रात्री महेशच्या पत्नीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम होता. घरी पाहुणे आले होते व हाताला मेहंदी काढण्यासाठी एक तरुणीदेखील आली होती. त्या तरुणीच्या आईने शेरूकडून कर्ज घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी शेरू तरुणीजवळ गेला व त्याने तिला शिवीगाळ सुरू केली. तुझ्या आईने पैसे घेतले असून तू फोन उचलत नाही. जर पैसे वेळेवर दिले नाही तर बघून घेईल,’ अशी धमकी दिली. घरात कार्यक्रम असल्याने महेशने शेरूला टोकले व ज्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांच्या घरी जाऊन पैसे माग असे म्हटले. यावरून शेरू संतापला व तुला दाखवतोच असे म्हणत त्याने घरात जाऊन चाकू आणला. त्याने व त्याच्या मुलाने महेशला मारहाण केली. रितीकने महेशला पकडून ठेवले व शेरूने त्याच्यावर चाकूने वार केले. महेश रक्तबंबाळ झाल्याने आरडाओरड झाली. त्यात आरोपी पळून गेले. महेशला मेडिकलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. इमामवाडा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी महेशचा भाऊ प्रणित याच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शेरूला नंदनवन येथून अटक केली. तर त्याचा मुलगा फरारच आहे.

पत्नीला मोठा धक्का, बाळाच्या जन्माअगोदरच पित्याचे छत्र हरवले
महेश हा अनुकंपा तत्वावर रेल्वेत नोकरीला लागला होता. पावणेदोन वर्षांअगोदरच त्याचे लग्न झाले होते. पत्नी गरोदर असल्याने दोघेही बाळाच्या भविष्याची स्वप्ने रंगवत होते. कार्यक्रमाचीदेखील जय्यत तयारी झाली होती. मात्र या घटनेमुळे त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. बाळाच्या जन्माअगोदर पित्याचे छत्र हरविले आहे.

आरोपी शेरू सराईत गुन्हेगार

आरोपी शेरू हा सराईत गुन्हेगार असून तो वस्तीत व्याजाने पैसे देण्याचे काम करायचा. त्याच्यावर २०१७ साली एका खुनाचा आरोपदेखील लागला होता. मात्र तो निर्दोष सुटला होता.

Web Title: Husband stabbed to death at his wife's baby shower ceremony solapur crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.