पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीची आत्महत्या
By admin | Published: September 19, 2016 02:37 AM2016-09-19T02:37:21+5:302016-09-19T02:37:21+5:30
पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. अभिषेक हिरालाल देशमुख (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
हुडकेश्वरमधील घटना : पोलिसांनी केला गुन्हा दाखल
नागपूर : पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. अभिषेक हिरालाल देशमुख (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चंदनशेषनगर हुडकेश्वरमधील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहत होता.
हारफुलांचा व्यवसाय करणाऱ्या अभिषेकचे वर्षभरापूर्वी नागपुरातीलच सोनू ऊर्फ ऐश्वर्यासोबत लग्न झाले होते. काही दिवस ठीक गेल्यानंतर सोनू आणि अभिषेकमध्ये भांडणे व्हायला लागली. अभिषेकचा भाऊ योगेश याच्या तक्रारीनुसार, सोनू तिची मावस बहीण कोमल ढोंगे हिच्यासोबत उठसूठ बाहेर फिरायला जात होती. बाहेर जाण्याचे कारणही सांगत नव्हती. प्रत्येकवेळी ती बाहेर निघून जात असल्याने अभिषेक तिला विचारणा करायचा. मात्र, ती त्याला दाद देत नव्हती. बाहेर फिरायला जाण्यास मनाई केली तर सोनू अभिषेकसोबत भांडण करायची. तिच्या या वर्तनाने सोनू त्रस्त झाला होता. बाहेर बदनामी होत असल्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला.
त्यामुळे त्याने गुरुवारी १५ सप्टेंबरला दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून गळफास लावून घेतला. सायंकाळी ५.३० वाजता ही घटना उघडकीस आली. अभिषेकने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली.
आत्महत्येला पत्नी सोनू हिचे वर्तनच कारणीभूत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले. या घटनेमुळे देशमुख कुटुंबीयात तीव्र रोष निर्माण झाला.
योगेश हिरालाल देशमुख (वय २४, रा. शिवनगाव) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी आरोपी पत्नीविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.(प्रतिनिधी)
पत्नीच्या रागावर आत्महत्येचा प्रयत्न
पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्याने निराश झालेल्या रोशन दत्तूजी मांडळकर (वय ३३) नामक तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मांडळकर गंगाजमुना जवळच्या मासुरकर चौकानजीक राहतो. तो पेंटर आहे. दारूच्या नशेत पत्नीसोबत त्याचा वाद झाल्याने रागाच्या भरात पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. त्यामुळे रोशनने रविवारी सकाळी स्वत:च्या घराजवळ आपल्या हाताची नस ब्लेडने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी लकडगंज पोलिसांना कळविले. उपचारानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी मांढळकरविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.